'मनसे नाणारच्या विरोधात, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:36 PM2018-05-20T13:36:48+5:302018-05-20T13:36:48+5:30
पालकमंत्री, खासदार, आमदार ही सर्व सत्तेमधील नेतेमंडळी केवळ घोषणाबाजी करीत आहेत. प्रकल्पाबाबतची केवळ घोषणाबाजी, राजकारण करण्यापेक्षा प्रथम प्रकल्पाचे काम सुरू करा
देवगड : पालकमंत्री, खासदार, आमदार ही सर्व सत्तेमधील नेतेमंडळी केवळ घोषणाबाजी करीत आहेत. प्रकल्पाबाबतची केवळ घोषणाबाजी, राजकारण करण्यापेक्षा प्रथम प्रकल्पाचे काम सुरू करा, तरच जनता व मनसे तुमचा जाहीर सत्कार करेल, असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
हॉटेल डायमंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर यांनी सत्ताधाºयांबरोबरच विरोधी आमदारांवरही टीका केली. ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे माजी आमदार औष्णिक प्रकल्पाला विरोध करीत होते व आता नाणारसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाची बाजू घेऊन समर्थन करताना दिसत आहेत. परंतु मनसे पक्ष नाणार प्रकल्पाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या प्रकल्पाची झळ मच्छिमार व आंबा बागायतदारांना पोहोचणार आहे याचे कोणालाही सोयरसुतक नाही. चार वर्षांपूर्वी पवनऊर्जा प्रकल्प, आनंदवाडी प्रकल्प याबाबत माजी आमदारांनी घोषणाबाजी केली होती.
आनंदवाडी प्रकल्पाचे काम आधी सुरू करा व नंतरच बोला. प्रकल्पावरून माजी आमदार, खासदार, विद्यमान आमदार यांच्यामध्ये राजकारण सुरू झाले आहे. देवगडमधील जनतेला राजकारणाचे कोणतेही देणे-घेणे नाही. घोषणाबाजी करण्यापेक्षा प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करा, असे आव्हानही उपरकर यांनी दिले.
देवगड तालुक्याचे सुपुत्र हे आरोग्यमंत्री असूनही तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था गंभीर आहे. देवगड ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करण्यासाठी पाच वर्षे लागली. या रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त असून सोयीसुविधांची वानवा आहे. निवडणुका जवळ आल्या की घोषणा केल्या जातात. अशाप्रकारच्या घोषणा आता जनतेला ऐकायला मिळतील. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनेच ठरवावे.
- परशुराम उपरकर, मनसे प्रदेश सरचिटणीस