आशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक, कंपनीला विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 03:41 PM2019-12-06T15:41:50+5:302019-12-06T15:43:32+5:30
दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.
दापोली : तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.
महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांच्या आदेशानुसार उंबरशेत, उटंबर खाणपट्ट्यातील खनिकर्मच्या उत्खननाबाबत दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील जनतेच्या हरकती असल्यास जनसुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही लोकांच्या विरोधामुळे आशापुरा मायनिंग गेले वर्षभर बंद आहे. मायनिंगच्या उत्खननाला काही लोकांचा विरोध असल्याने आशापुरा मायनिंग कंपनी बंद आहे. त्यामुळे या जनसुनावणीत ग्रामस्थांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते.
जनसुनावणीसाठी केळशी परिसरातील ग्रामस्थ सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहाबाहेर जमले होते. जनसुनावली सुरूवात होताच ग्रामस्थांनी कंपनी विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. खाणपट्ट्यात सुरू असलेल्या मायनिंगमुळे या भागातील आंबा, काजूच्या बागा नष्ट होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीला आपला विरोध कायम ठेवला.
या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच उधळून लावल्याने अधिकाऱ्यांनीही ही सुनावणी थांबवली. ग्रामस्थांच्या या विरोधी भूमिकेमुळे आशापुरा मायनिंग कंपनीचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.