केंद्रप्रमुख संघाकडून आंदोलने करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:24+5:302021-05-27T04:33:24+5:30
रत्नागिरी : मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात केंद्रप्रमुख संघाच्यावतीने आंदोलने करावी लागणार आहेत. त्यादृष्टीने सर्व केंद्रप्रमुखांनी तयारीला लागण्याचे ...

केंद्रप्रमुख संघाकडून आंदोलने करणार
रत्नागिरी : मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात केंद्रप्रमुख संघाच्यावतीने आंदोलने करावी लागणार आहेत. त्यादृष्टीने सर्व केंद्रप्रमुखांनी तयारीला लागण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी केले आहे. केंद्रप्रमुख संघाच्या राज्य पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्षांची नुकतीच ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघातर्फे राज्यातील केंद्र प्रमुखांचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले १४ प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्नात असून, साम, दाम, दंड, भेड या चतु:सूत्रीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष महाले यांनी केले आहे. ते केंद्रप्रमुख संघाच्या राज्य पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या ऑनलाईन नुकत्याच झालेल्या सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कार्याध्यक्ष जयवंतराव डुबे, राज्य कोषाध्यक्ष निंबाजी निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा स्तरावरचे प्रश्न तथा संघटना बांधणी, राज्यस्तरावरचे प्रश्न व संघटनेची वाटचाल व भूमिका याबद्दल चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुखांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सहकार्य घेण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महाले यांनी सांगितले. प्रामाणिक व एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच केंद्रप्रमुख संघात काम करण्याची संधी असून, मोजकेच पण कट्टर सहकारी ही संघटना पुढे नेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी आपली मवाळवृत्ती सोडून आक्रमक होण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध विभागाकडून केंद्रप्रमुखांचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती थांबविण्याची गरज निर्माण झाली असल्याची स्पष्ट भूमिका महाले यांनी मांडली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष जयवंतराव डुबे यांनी संघटनेची वाटचाल विशद केली. कोषाध्यक्ष निंबाजी निकम यांनी संघटनेचे सभासद वाढविण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात २५१ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर असून १३८ कार्यरत आहेत. त्यापैकी ११५ केंद्रप्रमुख महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी या संघटनेचे नोंदणीकृत सभासद असल्याची माहिती या सभेत जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचे प्रश्न जोरदारपणे त्यांनी मांडल्याने राज्याध्यक्ष महाले यांनी समाधान व्यक्त केले.