कृषी विकास अडकला कागदावर!
By admin | Published: October 23, 2014 10:13 PM2014-10-23T22:13:58+5:302014-10-23T22:51:23+5:30
रिक्त पदे : शासन अजूनही गंभीर नसल्याचेच चित्र
रहिम दलाल -रत्नागिरी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यात ३०२ पदे रिक्त आहेत़ एवढ्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा परिणाम विकासकामांवर होत असल्याने कृषी विकासाचे तीन-तेरा वाजले आहेत़
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये आता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच पाणलोट कार्यक्रम़ यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून जमीन नापीक होऊ नये, यासाठी बंधारे उभारण्यात येत आहेत़ त्यासाठी लागणारे तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी असतानाही ही कामे होत नसल्याची ओरड होत आहे़
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या विभागामध्ये जिल्ह्यासाठी ७८४ पदे मंजूर असून, ४८२ पदे भरलेली आहेत़ आतापर्यंत ३०२ एवढी कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांमध्ये गट अ - तंत्र अधिकारी ३ पदे, तालुका कृषी अधिकारी २ पदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, मृद व सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, मोहीम अधिकारी प्रत्येकी १ पद़ गट ब - कृषी अधिकारी ८ पदे, मंडल कृषी अधिकारी ११ पदे अद्याप रिक्तच आहेत.
गट ब (क) - कृषी अधिकारी १४, कृषी सहाय्यक ११४ पदे, अधीक्षक २ पदे, सहाय्यक अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक ९ पदे, लिपिक २५ पदे, लघुलेखक, लघुटंकलेखक प्रत्येकी १ पद, अनुरेखक ४३ पदे, वाहन चालक- १० पदे़ गट ड- शिपाई - पहारेकरी २६, रोपमळा मदतनीस १५ पदे, गे्रड वन मजूर १० पदे, टिलर आॅपरेटर १ पद या पदांचा समावेश आहे़
गट अ मध्ये सहापैकी एकही पद रिक्त नाही़ गट ब मध्ये २२ पैकी १३ पदे भरलेली असून, ९ पदे रिक्त आहेत़ गट ब (क) मध्येही ४४ पैकी २१ पदे रिक्त असून, २३ पदे भरण्यात आली आहेत़ तर गट क मध्ये ५९८ पदांपैकी ३७६ पदे भरलेली असून, २२२ एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्याची आवश्यकता आहे़ गट ड मध्येही ११८ पदांपैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली असून, ५२ पदे भरावयाची आहेत़़ एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदभरतीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वेळोवेळी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांच्याशी पाठपुरावा करण्यात आलेला आहे़ मात्र, तरीही शासनाकडून त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ एकीकडे कृषी विकासाचे धोरण देशभरात राबवत असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याचा कृषी विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़
निद्रिस्त शासन
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या जिल्ह्यात कृषी सहाय्यकांची ११४ पदे रिक्त आहेत़ ही पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त असल्याने त्यांच्या भरतीसाठी कृषी सहाय्यकांकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली़, तरी अद्याप शासनाला जाग आलेली नाही.