कृषी अवजारे महाडीबीटी प्रणालीव्दारे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:32+5:302021-05-20T04:34:32+5:30
रत्नागिरी : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेली यंत्रे व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणे, खासगी उत्पादकांनी विकसित ...
रत्नागिरी : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेली यंत्रे व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणे, खासगी उत्पादकांनी विकसित केलेली नावीन्यपूर्ण यंत्रे व अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. निवड झालेली अवजारे महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर दिली जाणार आहेत.
कृषी विद्यापीठातर्फे विविध स्वरूपाचे व नावीन्यपूर्ण यंत्र व अवजारे विकसित केली आहेत. विद्यापीठांतर्फेे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्याच्या मर्यादा येतात. मात्र त्यांचा योजनेत समावेश नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत नाहीत. यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडप्रक्रियेसाठी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व संयुक्त कृषी संशोधन समितीने शिफारस केलेली कृषी यंत्र, अवजारे खासगी उद्योजकांतर्फे उत्पादित करण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठस्तरावर एक तांत्रिक समिती गठित करण्यात येणार आहे. याबाबत सूचना कृषी आयुक्त जाहीर करणार आहेत. या तांत्रिक समितीतर्फे उत्पादकांच्या पात्रतेचे निकष व स्वामित्व धनाची रक्कम निश्चित केली जाणार आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेली अवजारे यांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करून महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा सूचना केल्या आहेत. यांत्रिक अनुदान निश्चितीसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. समिती तांत्रिक बाबी पूर्ण करून कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय प्रकल्प छाननी समिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या मान्यतेनंतर ही अवजारे महाडीबीटी प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.