जिल्ह्यासाठी १०० कोटींचा कृषी आराखडा : चोरगे
By admin | Published: November 17, 2014 10:34 PM2014-11-17T22:34:04+5:302014-11-17T23:20:18+5:30
अन्य व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेती संस्थांनी आता ‘खावटी कर्ज’ देणे या एकाच कामातून बाहेर पडावे व विविध कार्य करण्याचा या सोसायट्यांचा उद्देश सफल करण्यासाठी अन्य व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांच्या विभागाचा आर्थिक विकास साधणे शक्य होईल. यावर्षी जिल्हा बॅँकेने शंभर कोटींचा कृषी आराखडा तयार केल्याचे प्रतिपादन बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केले. बॅँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३८० पैकी निवडक ५६ विकास संस्थांना संगणक व प्रिंटर बॅँकेतर्फे भेट देण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बॅँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर, संचालक अॅड. दीपक पटवर्धन तसेच अन्य संचालक उपस्थित होते. जिल्ह्यातील ७ खरेदी -विक्री संघांनाही संगणक भेट देण्याचा बॅँकेचा प्रस्ताव असल्याचेही चोरगे यांनी सांगितले. यावेळी ५६ कार्यकारी संस्थांना संगणक, प्रिंटर व त्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर्सही बॅँकेला झालेल्या नफ्यातून देण्यात आली. उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले की, ५६ संस्थांप्रमाणेच अन्य चांगले काम करणाऱ्या विकास सोसायट्यांनाही अध्यक्षांनी संगणक देण्याचा विचार करावा. संगणकामुळे विकास संस्थांचे काम सोपे होईल, असेही जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)
जिल्हा बॅँकेस आयएसओ
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या गेल्या कारकिर्दीतील चांगल्या कामांची दखल घेण्यात आली आहे. या बॅँकेला आयएसओ दर्जा प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यात सातारा, रायगड व रत्नागिरी या तीन बॅँकांना हे मानांकन मिळाले आहे, अशी माहिती डॉ. चोरगे यांनी दिली.