ऐन श्रावणात सणासुदीचा गाेडवा कमी झाला; साखर महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:36 AM2021-08-14T04:36:43+5:302021-08-14T04:36:43+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले चार महिने साखरेचे दर बऱ्यापैकी स्थिर होते. ३४ रुपये किलो दराने ...
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले चार महिने साखरेचे दर बऱ्यापैकी स्थिर होते. ३४ रुपये किलो दराने साखर विक्री सुरू होती. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक साखरेचे दर कडाडले असून ३८ रुपये किलाे दराने साखर विक्री सुरू आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. त्यातच किलोमागे चार रुपयांनी दरवाढ केल्याने ग्राहकांना मात्र चांगलाच भुर्दंड बसला आहे.
श्रावणापासून गणेशोत्सवापर्यत सणासुदीच्या काळात घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरू असते. गोड पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात; परंतु साखरच महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाऊक बाजारातच दर वाढले असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील माॅल्समधील विक्रीदरातही वाढ झाली आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट मात्र कोलमडले असून नाराजी व्यक्त होत आहे.
गुळाला मागणी
आयुर्वेदामध्ये गुळाचे महत्त्व विशद केले आहे. मधुमेहाच्या भीतीमुळे साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर केला जातो. ४५ ते ५० रुपये किलो दराने गूळ विक्री सुरू आहे. साखरेपेक्षा गुळाचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे गुळाचा वापरही मर्यादितच आहे.
दरवाढीवर निर्बंध असावेत
खाद्यतेलापाठोपाठ आता साखरेचे दरात वाढ करण्यात आली आहे. किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. श्रावणापासून सण सुरू होतात. त्यामुळे दैनंदिन वापरापेक्षा सणासुदीच्या काळात खप अधिक होत असतानाच दरवाढ करण्यात आली आहे.
- रोहिणी पाध्ये, गृहिणी
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करण्यापूर्वी किंवा महागाईचा दर निश्चित करताना, सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करणे गरजेचे आहे शिवाय दरवाढीवर शासनाचे निर्बंध असणे आवश्यक आहेत. मात्र, तसे होत नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. यामुळे महिन्याचे बजेट वाढले आहे.
- प्राजक्ता चाळके, गृहिणी
दरवाढीचे कारण गुलदस्त्यातच
जिल्ह्यात साखरेची आवक नवी मुंबई, कोल्हापूर येथून होत आहे. पूर व दरडी कोसळल्यामुळे पर्यायी मार्गाने अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. अंतर वाढल्याने इंधन व वाहतूक खर्चात वाढ झाली असल्याने दरवाढ झाली असावी, मात्र प्रत्यक्ष कारण मात्र समजू शकले नाही.
- अमित शेट्ये, व्यापारी
गेल्या आठवड्यात साखरेचे भाव बऱ्यापैकी स्थिर होते. मात्र, आठवड्याशेवटी अचानक दरवाढ जाहीर करण्यात आली. घाऊक मार्केटमध्ये दर वाढल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. किलोमागे तब्बल चार रुपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीचे कारण मात्र सांगण्यात आलेले नाही.
- आसिफ मेमन, व्यापारी