विकासासाठी विमानतळ महत्वाचे, रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
By मनोज मुळ्ये | Published: August 21, 2024 12:01 PM2024-08-21T12:01:03+5:302024-08-21T12:02:05+5:30
रत्नागिरी : उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय ...
रत्नागिरी : उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत आहे. या सर्व विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा सरकार देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक नवे उद्योग येत आहेत. अफाट निसर्ग सौंदर्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे त्यासाठी विमानतळ ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. म्हणूनच रत्नागिरीतील विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावा, येथे नाईट लँडिंग चे व्यवस्था व्हावी, यासाठी टर्मिनल इमारतीची गरज होती. या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच विमान वाहतूक सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.