कामथे उपसरपंचपदी अक्षता कासार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:43+5:302021-04-14T04:28:43+5:30
चिपळूण : तालुक्यात राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या कामथे ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत एक चिठ्ठीच ...
चिपळूण : तालुक्यात राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या कामथे ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत एक चिठ्ठीच गायब झाल्याने उपसरपंच निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे यावेळेच्या घडामोडींकडे लक्ष होते. मात्र, अक्षता कासार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कामथे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक चार वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या थेट सरपंच निवडणुकीत विजय माटे यांनी बाजी मारली होती. त्यानंतर उपसरपंच निवडणूक झाली. उपसरपंच निवडणुकीत एक चिठ्ठी गायब झाल्याने त्यावेळची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. प्रदीप उदेग उपसरपंच म्हणून विजयी झाले होते. दरम्यान, अलिकडेच प्रदीप उदेग यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कामथे ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. सरपंच माटे गटाकडे ४, तर विरोधी हरी कासार गटाकडे ५ सदस्य आहेत. माटे गटाकडून कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे उपसरपंचपदी अक्षता अजित कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गतवेळच्या निवडणुकीतील घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासह सर्व तयारी केली होती. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी रजनी बाईत, पूजा बाईत, महेश खेडेकर, कृष्णा माटे, मनोज खेडेकर, प्रदीप उदेग, रिया महाडिक, वासंती कदम, अक्षता कासार या ९ सदस्यांसह ग्रामसेविका अनिता पाटील, नेहा चव्हाण, स्वप्नील लटके उपस्थित होते.