दारूचे गुत्ते ठरताहेत संसर्गाचे केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:26+5:302021-05-16T04:30:26+5:30
आवाशी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार उडवला आहे. आता त्याची शहरांपेक्षा ग्रामीण वस्तीत मोठ्या प्रमाणात साखळी तयार ...
आवाशी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार उडवला आहे. आता त्याची शहरांपेक्षा ग्रामीण वस्तीत मोठ्या प्रमाणात साखळी तयार होण्याची चित्रे दिवसागणिक दिसू लागली आहेत. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या गावठी दारूच्या गुत्त्यांवर होत असलेली गर्दी आता कोरोना संसर्गाचे केंद्र ठरत असल्याचे पंचक्रोशीतून बोलले जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या या विषाणूचा अधिक संसर्ग वाढीस लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण वस्तीत कोरोनाने शिरकाव केला आहे. वृद्धांसह अनेक तरुणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. आरोग्य यंत्रणाही याच्यासमोर हात टेकून आहेत.
खेड तालुक्यात लोटे - परशुराम येथे औद्योगिक वसाहत कार्यान्वित आहे. यातील सर्वच कंपन्यांमधून स्थानिकांसह, जिल्हा, परजिल्हा व परप्रांतातील मजूर येथे काम करीत आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीभोवतीचा परिसर दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जात आहे. येथे रोजगारासह अनेक अनैतिक धंदेही सुरु असल्याचे यापूर्वीपासूनच सर्वांना ज्ञात आहे. त्यातीलच गावठी दारू विक्रीची दुकानेही येथे अनेक काळापासून सुरु आहेत. मात्र हीच गावठी दारूची दुकाने सध्या कोरोना रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. लोटे आणि परिसरात सुरु असणाऱ्या या गुत्त्यांवर सकाळ व सायंकाळ स्थानिक तळीरामांसह परप्रांतीय मजुरांचीही गर्दी होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी येथील लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या माध्यमातून येथे गावठी दारूसह, देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या एका स्थानिकावर धाड टाकून त्याला ताब्यात घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांनी अशी कारवाई सातत्याने करुन येथील दारूचे गुत्ते बंद करावेत व सध्याच्या कोरोना वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या अशा अजूनही काही गुत्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.