पाटणेच्या तोंडाला मद्याचा वास
By Admin | Published: July 8, 2017 06:16 PM2017-07-08T18:16:56+5:302017-07-08T18:16:56+5:30
वैद्यकीय अहवाल : पुढील तपासणीसाठी रक्ताचे नमुने कोल्हापूरला
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. ८ : भरधाव वेगाने कार चालवून अनेकांना धडक देणाऱ्या ऋषिकेश पाटणे याच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे़ शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण समजण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी पत्रकारांना दिली़
ऋषिकेश पाटणे हा बुधवारी वॅगनआर कार घेऊन जात होता़ त्यावेळी त्याचा गाडीचा ताबा सुटला़ त्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांना धडक दिली. बस स्थानकासमोर त्याची कार दुभाजकावर आपटली. या एकूणच अपघातात चारजण धडक दिली होती़ त्यातील प्रकाश अनंत शिंदे व ऋषिकेश नलावडे गंभीर जखमी झाले, तर तस्लीम तांबू व तिचा मुलगा महंमद हे किरकोळ जखमी झाले होते़ या दुर्घटनेत ऋषिकेशही जखमी झाला़ तसे त्याला जमावाने मारहाणही केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला़ आहे.
पोलिसांनी ऋषिकेश पाटणे याची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या अहवालात ऋषिकेश पाटणे याच्या श्वासातून मद्याचा वास येत असल्याचे, तसेच अशक्तपणा व बोलण्यात अस्पष्टपणा असल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे अपघाताच्या वेळी ऋषिकेश पाटणे याच्या शरीरात मद्याचे प्रमाण किती होते, हे समजण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती विनीत चौधरी यांनी पत्रकारांना दिली़