शोलेतील जय अवतरला लांजात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:57 PM2020-07-27T20:57:30+5:302020-07-27T20:58:40+5:30
दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
लांजा : मला दहीहंडीची प्रॅक्टिस करायची आहे असे सांगत एक मद्यपी माणूस मोबाईल टॉवरवर चढला. त्याचे ते लडखडते वर्तन पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शोलेतल्या जयची आठवण करून देणारा हा प्रकार सोमवारी सायंकाळी लांजा बसस्थानकाजवळ घडला. दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
हा टॉवरला जवळपास तीनशे फूट उंच आहे. सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास विजय पांडुरंग नेमण ( ४५ ) हा याने टॉवरवर चढायला सुरुवात केली. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच लोकांनी यांनी त्याला पाहिले टॉवरवर न चढण्याचा सल्ला दिला. मात्र तो कुणाचेही न ऐकता विजय लोखंडी शिडीवर चढ होता. खाली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती प्रत्येकजण त्याला खाली उतर असे विनंती करत होते. मात्र तो ऐकतच नव्हता व वरून तो दहीहंडीचे दिवस आले आहेत. मी सराव करतो आहे, असे बोलत होता.
तो जवळपास दिडशे फुट वरती चढला तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. तातडीने सहाय्यक पोलीस फौजदारी दिलीप पवार , सुनील चवेकर , उदय धुमास्कर , हेडकाँन्टेबल प्रमिला गुरव , शांताराम पंदेरे यांनी धाव घेतली आणि त्याला उतरण्यास सांगितले . पोलिसांना पाहिल्यानंतर तो खाली उतरला ताबडतोब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे . शहरामध्ये मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह चालवतो व उरलेल्या पैशांची दारु पितो असा त्याचा नित्यक्रम असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.