मद्यपी वैद्यकीय अधिकाऱ्याचा रुग्णालयात धिंगाणा
By Admin | Published: December 2, 2014 11:14 PM2014-12-02T23:14:07+5:302014-12-02T23:16:34+5:30
कारवाईची मागणी
चिपळूण : आपली पत्नी आजारी आहे, तिच्यासाठी अॅम्ब्युलन्स द्या, अशी मागणी करत रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आज, मंगळवारी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत जोरदार धिंगाणा घातला. दुसऱ्या गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्याने जुमानले नाही.
रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे ३० ते ४० रुग्ण बसले होते. डॉक्टर येतील व आपल्याला तपासतील, या अपेक्षेत ते असताना मद्यधुंद अवस्थेत आपल्या केबिनमध्ये बसलेले वैद्यकीय अधिकारी शिवराज घोगरे यांनी आपली पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णवाहिका द्या, असे सांगत गोंधळ घातला. त्याने कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व अर्वाच्च शिवीगाळ केली. रुग्णालयातील हा गोंधळ ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रवक्ते राजेश जाधव यांनी डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंच महेश कातकर हेही घटनास्थळी आले.
हा विषय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार त्यांनी खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांना रामपूर येथे पाठविले. डॉ. परदेशी यांच्यासमोरही घोगरे यांचा गोंधळ सुरूच होता.
कारवाईची मागणी
वैद्यकीय अधिकारी शिवराज घोगरे यांच्या व्यसनामुळे डॉ. परदेशी यांना खरवते येथील ओपीडी सोडून रामपूर येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी जावे लागले. येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने अनेक वैद्यकीय अधिकारी मनमानी करीत आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम यांनी केली आहे.