मंडणगडात एकाच ठिकाणी सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:21+5:302021-05-07T04:33:21+5:30
मंडणगड : मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात मंडणगड शहरातील गांधी चौक येथील एकाच स्मशानभूमीचा वापर कोविड व नॉन कोविड मृतांचे ...
मंडणगड : मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात मंडणगड शहरातील गांधी चौक येथील एकाच स्मशानभूमीचा वापर कोविड व नॉन कोविड मृतांचे अंत्यविधीसाठी होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या गंभीर विषयासंदर्भात शहरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर नगर परिषदेने काेराेनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
मंडणगड तालुक्यात एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. या कालावधीत कोविडमुळे मयत झालेल्या पार्थिवांचे अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा प्रश्न स्थानिक आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला हाेता. प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात मोठ्या हालचाली झाल्याने सरतेशेवटी नगरपंचायतीने मंडणगड गांधी चौक येथील स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली; मात्र त्यासाठी स्मशानभूमी सज्जतेसाठी आवश्यक असणारी कोणतीही पूर्वतयारी कऱण्यात आलेली नव्हती. दोन आठवड्याच्या कालावधीत सुमारे दहा मृतदेहांचे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत. महानगरातील कोविडचा मृत्यूदर लक्षात घेता राज्यातील अनेक शहरात कोविड मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी एकाच स्मशानभूमीत कोविड मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तसदी नगरपंचायत प्रशासनाने घेतली नाही. यामुळे स्मशानभूमीच कोविड संसर्गाचे केंद्र बनण्याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती.
दोन आठवड्यांनंतर मृतांचे प्रमाण लक्षात घेऊन कोविडग्रस्त मृतदेह जाळण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी नगरपंचायतीने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील स्मशानभूमीत त्यासाठी काही भूभागावर खोदकाम करण्यात आले आहे. सरणासाठी आवश्यक असणारे लोखंडी स्तंभ मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू असून, आवश्यक लाकडे आधीच साठवून ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पीपीई किट प्राप्त झाली आहे. नगरपंचायतीचे वरातीमागून घोडे नाचवण्याच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.
............................................
मंडणगड गांधी स्मशानभूमीत कोविड मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र सोय करण्यासाठी खाेदाई करण्यात आली आहे.