अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढील पाच वर्षे दहा लाख देणार, उद्योगमंत्री सामंतांची घोषणा
By मेहरून नाकाडे | Published: February 5, 2024 06:41 PM2024-02-05T18:41:27+5:302024-02-05T18:42:04+5:30
१२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन
रत्नागिरी : वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची पाच वर्षे दहा लाख रुपये तसेच पुढील दहा वर्षे १५ लाख रुपये दिले जातील. तसा ठराव एमआयडीसीच्या बैठकीत केला जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. त्याचवेळी त्यांनी पुढील वर्षीही रत्नागिरी येथेच संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी सूचना केली.
स्वयंवर मंगल कार्यालयात १२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोमवारी (दि.५) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, निलेश महाराज, देवीदास महाराज, श्रीमंत शितोळे सरकार उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांनी मार्गदर्शन करताना, वारकरी संप्रदयाचा विचार ज्यांने ज्यांने घेतला तो जगात नावारुपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे. हा संस्कार अशा संमेलनातून देऊन निरोगी समाजमन बनण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले.