सर्व लाेकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:00+5:302021-06-16T04:42:00+5:30
रत्नागिरी : तुम्ही सर्व कर्मचारी आहात म्हणूनच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या ...
रत्नागिरी : तुम्ही सर्व कर्मचारी आहात म्हणूनच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत. सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय त्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपले कोविड हॉस्पिटलचा राज्यातील चांगले कोविड हॉस्पिटल म्हणून गौरव झाला पाहिजे, असे काम करावे, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंंत्री उदय सामंत यांनी केल्या़
उद्यमनगर येथील कोविड रुग्णालयाबाबत साेशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यात आला हाेता़ त्यानंतर येथील डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर बदनामी सुरू केल्याने काम बंदचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी व आवश्यक त्या सूचना करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी कोविड हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांच्यासाेबत आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ़ संघमित्रा फुले - गावडे, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ़ बबिता कमलापूरकर यांची उपस्थिती हाेती.
कोविड हॉस्पिटलमध्ये पाणी नसते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असते. तसेच येथील कर्मचाऱ्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्याचा हट्ट करत असतात. रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे नातेवाइकांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा अनेक समस्या मंत्री उदय सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी कर्मचारी, अधिकारी यांना सूचना देऊन त्यांना धीर दिला़ तसेच चांगले काम करून या रुग्णालयाचे नाव उंचवावे, असे सांगितले़
----------------------------------
रत्नागिरीतील महिला काेविड रुग्णालयातील समस्यांबाबत मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली़ यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित हाेते़