हाती उरला आता केवळ चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:34+5:302021-07-25T04:26:34+5:30
अरुण आडिवरेकर रत्नागिरी : चिपळूणवासीयांसाठी गुरुवार (२२ जुलै)ची पहाट जणू जीवघेणीच ठरली हाेती. शहरात पहाटेच्या सुमाराला पुराचे पाणी शिरले ...
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : चिपळूणवासीयांसाठी गुरुवार (२२ जुलै)ची पहाट जणू जीवघेणीच ठरली हाेती. शहरात पहाटेच्या सुमाराला पुराचे पाणी शिरले आणि घरातील अनेकांनी जीव वाचविण्यासाठी आक्राेश सुरू केला. काहींचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला तर काहींची राेजीराेटीच हिरावून गेली. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले पण समाेर केवळ चिखलच चिखल दिसत हाेता. बाकी सारे पुराच्या पाण्याने हिरावून घेतले हाेते. डाेळ्यातील अश्रूंचा हुंदका आवरत घरातील चिखल साफ करण्याखेरीज आता चिपळूणकरांच्या हाती काहीच राहिलेले नाही.
वाशिष्ठी व शिव नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुरुवारी पहाटेपासून चिपळूणसह खेर्डीमध्ये पूर भरण्यास सुरुवात झाली. हळूहळू पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि संपूर्ण चिपळूण शहर पुराने वेढले गेले. पुराचे पाणी घरांमध्ये पाणी शिरू लागले आणि बघता-बघता घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचले. घरात राहणेही मुश्किल झाल्याने घरांमधील नागरिकांनी मदतीसाठी टाहो फोडला, तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने अनेकांनी थेट टेरेस गाठले. सुमारे १५ ते २० फूट पाणी असल्याने नागरिकांपर्यंत मदत पाेहाेचणेही शक्य झाले नाही. वीज नव्हती, माेबाइल यंत्रणा बंद पडली त्यामुळे संपर्काचे मार्गही बंद झाले हाेते. जसजशी रात्र हाेऊ लागली तसा नागरिकांचा जीव भांड्यात पडू लागला. तोपर्यंत पुरात अडकलेल्या चिपळूण शहरासह खेर्डी, बहादुरशेखनाका, कळंबस्ते, बापटआळी, बेंदरकरआळी, चिंचनाका येथील नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन इमारतींच्या टेरेसवर, घरांच्या छतांवर, पोटमळ्यात रात्र अक्षरश: जागून काढली.
शहरातील पुराचे पाणी शुक्रवारी सकाळी हळूहळू ओसरू लागले. खेर्डी, चिपळूण-काविळतळी, मार्कंडी, बहादुरशेखनाका, महामार्ग रेडीज पेट्रोल पंप परिसर, चिपळूण-गुहागर बायपास रोड देसाई बाजारपर्यंत, विरेश्वर तलाव परिसर, भोगाळे या भागातील पाणी ओसरले हाेते. मात्र, चिंचनाका ते बाजारपेठ परिसरात पाणी ‘जैसे थे’ राहिल्याने पुराच्या पाण्यातून वाट काढत अनेकजण सुरक्षितस्थळी जात हाेते. पूर ओसरलेल्या ठिकाणची परिस्थिती डाेळ्यात पाणी आणणारीच हाेती. अनेकांच्या घरात चिखल हाेता, तर दुकानांमध्ये शिरलेल्या चिखलमय पाण्यामुळे मालाचे नुकसान झाले हाेते. वाहने इतरत्र फेकली गेली हाेती. अनेकजण घरातील, दुकानातील चिखल बाहेर काढून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत हाेते. डाेळ्यातील अश्रू लपवत एकमेकांना आधार देत सर्वजण चिखल बाहेर काढण्याच्या कामात व्यग्र हाेते. या परिस्थितीतून सावरण्यासाठी चिपळूणकरांना अजून बराच कालावधी लागणार आहे.
----------------------------
एकमेकांना साहाय्य
चिपळूणसह, खेर्डी, कळंबस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी हाेती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकजण इमारतीच्या टेरेसवर गेले. सर्वांनी आपापल्या पद्धतीने भोजनव्यवस्था करून एकमेकांना दिलासा दिला. जे लोक सुरक्षितस्थळी होते. त्यांनी महापुरात अडकलेल्या पण जाणे शक्य आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना चहा, नाश्ता, जेवण पुरवून सहकार्य केले.