महाविकास आघाडीचे सारेच नगरसेवक ‘बांधकाम अभियंता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:27+5:302021-03-17T04:32:27+5:30

चिपळूण : महाविकास आघाडीचे नगरसेवक नगर परिषदेमार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाला बहुमताच्या जोरावर विरोध करत सुटले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लांबलेल्या ...

All Mahavikas Aghadi corporators are 'construction engineers' | महाविकास आघाडीचे सारेच नगरसेवक ‘बांधकाम अभियंता’

महाविकास आघाडीचे सारेच नगरसेवक ‘बांधकाम अभियंता’

Next

चिपळूण : महाविकास आघाडीचे नगरसेवक नगर परिषदेमार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाला बहुमताच्या जोरावर विरोध करत सुटले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लांबलेल्या काही कामांना मुदतवाढ नाकारून जनतेला व ठेकेदारास वेठीस धरण्याचा नवीन फंडा त्यांनी सुरु केला आहे. विकासकाम पूर्ण होईपर्यंत गप्प बसतात आणि काम झाले की, ते बरोबर झालेले नाही किंवा कामाचा दर्जा योग्य नाही, असे परस्पर पत्र देतात. महाविकास आघाडीचे नगरसेवक कधीपासून बांधकाम अभियंता झाले, असा टोला नगरसेवक विजय चितळे यांनी लगावला आहे.

शहरातील मार्कंडी ते बहाद्दूरशेख नाका दरम्यानच्या सुमारे १ कोटी १५ लाख रुपये खर्चाच्या डांबरीकरणाच्या कामाप्रश्नी महाविकास आघाडीचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी कामाचा दर्जा योग्य नसल्याचे पत्राद्वारे म्हटले आहे, तर त्याच कामाविषयी नगरसेवक अविनाश केळसकर यांनी पत्र देऊन थर्डपार्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. ते म्हणाले की, प्रत्येक कामात महाविकास आघाडी हा फंडा वापरत आहे. शहरातील शालिमार अपार्टमेंटनजीकच्या नाल्याच्या कामातही नगरसेविका सीमा रानडे, तर पाग येथील रस्त्याच्या कामाबाबत नगरसेविका सई चव्हाण यांनी काम पूर्ण झाल्यानंतर पत्र देऊन कामाचा दर्जा चांगला नसल्याचे म्हटले आहे. आज वर्षभर त्या नाल्यातून पाणी वाहून जात आहे, तर वर्षभरात रस्त्यावर एकही खड्डा नाही. मग कामाचा दर्जा योग्य नाही, हे कसे काय म्हणू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वाणीआळी व शंकरवाडी रस्त्याविषयी ठराव करताना नगरसेवक करामत मिठागिरी यांना ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर तुमचीच काम अडचणीत येतील, असे आपण सभागृहातच सांगितले होते. तरीही त्यांनी ठरावाच्या बाजूने बोट वर केले. आता तेच जनतेला सोबत घेऊन आवाज उठवत असतील तर त्यात नगराध्यक्षांचा दोष काय, असेही चितळे यांनी सांगितले.

चौकट

प्रत्येक कामाचे होते थर्डपार्टी ऑडिट

नगर परिषदेच्या प्रत्येक २० लाखावरील कामाचे थर्डपार्टी ऑडिट केले जाते. त्यासाठी नगरसेवक केळसकर यांनी वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाय मार्कंडी ते बहाद्दूरशेख नाका रस्त्याच्या कामाचे थर्डपार्टी ऑडिट आजच्या तारखेला तयार असून, त्यामध्ये रस्ता दर्जेदार असल्याचे नमूद आहे. तरीही नागरिक व ठेकेदारास वेठीस धरले जात आहे.

चौकट

सांस्कृतिक केंद्राचीही मुदतवाढ नाकारली

कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील ४८ कामांची यादी मुदत वाढीसाठी ठेवली होती. त्यापैकी ३७ कामांना मुदतवाढ दिली आणि ११ कामांची नाकारली. त्यामुळे महाविकास आघाडीच्याच नगरसेवकांची कामे रखडली आहेत. मात्र, आता नगराध्यक्षांकडे बोट दाखवले जात आहे. सांस्कृतिक केंद्राच्या बाबतीतही हेच घडले आहे. त्यांचेच मंत्री नाट्यगृह ताबडतोब सुरू करा, असे सांगतात आणि त्यांचेच नगरसेवक कामाची मुदतवाढ नाकारत असतील, तर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या पाच नगरसेवकांना घेऊन त्या कशा काम करू शकणार, असेही चितळे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: All Mahavikas Aghadi corporators are 'construction engineers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.