राजापुरात उद्या सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:06 PM2022-03-05T14:06:35+5:302022-03-05T14:07:48+5:30
शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत
राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने कंबर कसली आहे. त्यासाठी ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर धोपेश्वर येथील यशोदिन गार्डन हॉल येथे दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे.
नाणार व लगतच्या गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना मोठ्या विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधानंतर शासनाने रद्द केली. हा प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर जाता कामा नये याकरिता तालुक्यातून सतत मोठा उठाव सुरू आहे. अशातच शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्पाला मोठे समर्थन मिळत असताना काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे.
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प या सर्व बाबी पूर्ण करणारा असून, सोबतच मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा, तालुका व जिल्हावासीयांसाठी घेऊन येणारा आहे. तसेच रस्ते, रेल्वे, वीज इत्यादी पायाभूत सुविधांचा विकासही करणारा आहे.
राजापूर नगर परिषदेसह तालुक्यातील सुमारे सव्वाशे गावांनी तसेच जवळपास ५० विविध संघटनांनी हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, याकरिता सरकारकडे साकडे घातले आहे. या प्रकल्पाचे सर्वंकष स्वागत करण्यासाठी व या रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्याचे समर्थन आहे, हे दर्शविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
उद्याेग निर्माण हाेणे गरजेचे
राजापूर तालुक्याचे व रत्नागिरी जिल्ह्याचे औद्योगिक मागासलेपण दूर करण्यासाठी निरनिराळ्या उद्योगधंद्याची आवश्यकता आहे. शहराच्या दिशेने विस्थापित होणारे तरुण - तरुणी व त्यांचे कुटुंबीय यांचे कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर छोटे उद्योग निर्माण होणे आवश्यक आहे.