Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:06 PM2018-08-28T17:06:38+5:302018-08-28T17:09:06+5:30
जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे.
दापोली : जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे.
या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणांहून मदत झाली. शासन स्तरावरुनदेखील या घटनेची तत्काळ दखल घेतली गेली. मात्र, मदत मिळूनही कुटुंबाना दु:खाच्या दरीतून सावरण्याचे बळ मिळाले नाही.
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण हिंदू धर्मियांचे आनंदाचे सण. मात्र, अनेकांच्या घरी या सणाचा आनंद ओसरुन गेला. काही दिवसांवर दहीहंडी सण येत असून, २८ जुलैनंतर दापोली तालुक्यामध्ये या घटनेचे सावट सर्वच ठिकाणी दिसून आले. आंबेनळी घाटातील बस अपघात कसा घडला, याबाबत नेमके कारण आजही समजू शकले नाही. विद्यापीठातील मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांकडून या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून शासन दरबारी मागणी जोर धरु लागली आहे.
आंबेनळी घाटामध्ये मदतीचे अनेक हात धावून आले होते, तर रेस्क्यू टीमनेदेखील या घटनेमध्ये अथक परिश्रम घेतले. या घटनेमुळे महाबळेश्वर मार्गावर जाण्याचे धाडस अनेकांना होईनासे झाले तर ती आठवण आजही अनेकांच्या मनात ताजी आहे. या घटनेबाबत महाबळेश्वरमधील रेस्क्यू टीम यांनी महाबळेश्वरवरील प्रेम कमी करू नका, असे सांगितले.घटना घडून एक महिना पूर्ण झाला असून घटनेतील नेमके रहस्य काय हे आज तरी उलघडले नाही. किशोर चौगुले यांचे वडील पी. एम. चौगुले यांनी १३ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक रायगड यांना घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून पत्र पाठविले आहे. मात्र आज तरी या घटनेतील गूढ उकलले नाही.
अ३३ंूँेील्ल३२