रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:16 PM2021-04-06T12:16:28+5:302021-04-06T12:18:12+5:30
corona virus Ratnagiri School- कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरी : कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा मंगळवारपासून बंद राहणार आहेत. पुढील शासन आदेश येईपर्यत शाळांमधील अध्यापन बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार आहेत.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र शाळांना जिल्हा प्रशासनाकडून काहीच आदेश प्राप्त न झाल्याने सोमवारी सर्वच शाळांमध्ये नियमितपणे वर्ग भरले होते. सर्वत्र आदेशाचीच चर्चा होती. अखेर शाळांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा बंदची सूचना देण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी अनेकांचे पेपर घेण्यात आले.
बहुतांश शाळांच्या नववीच्या व अकरावीच्या परीक्षा सुरू असून, अंतिम टप्यात आहेत. दहावी व बारावीचे विद्यार्थी मात्र अभ्यासासाठी घरीच आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर नववी व अकरावीच्या वर्गांबाबत काय करणार, असा प्रश्न होता. सोमवारी नववी व अकरावीचेही वर्ग बंद करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. गतवर्षी १५ मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी दि. ६ एप्रिलपासून शाळा बंदचा करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे शासन निर्णयानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या ३२०२ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीपर्यंतची सर्व मुले पास करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन केले जाणार आहे. नववी ते अकरावीचेही वर्ग पुढील शासन आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दहावी व बारावी परीक्षेबाबत बोर्डाकडून निर्णय जाहीर केले जाणार आहेत.
- निशादेवी वाघमोडे,
शिक्षणाधिकारी, रत्नागिरी