अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्ण दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:35+5:302021-04-07T04:31:35+5:30
रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. त्यानुसार जिल्ह्यात सकाळी ७ ...
रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. त्यानुसार जिल्ह्यात सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जमावबंदी, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवावगळता, सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स पूर्ण दिवस बंद राहणार आहेत.
ब्रेक दि चेनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास प्रतिबंध राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास मनाई राहील.
मात्र, वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. तसेच सर्व सार्वजनिक अत्यावश्यक सेवांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोराेनाविषयक उपाययाेजनांचे पालन करणे बंधनकारक राहील. या सर्वांसाठी मास्क आणि सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे राहील.
...अशी आहे नियमावली :
- सर्व समुद्र किनारे, उद्याने, सार्वजनिक मैदाने शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. दिवसा येणाऱ्या अभ्यागतांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
- टॅक्सी (चारचाकी वाहन) चालक आणि वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के राहतील. रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाही. मास्कचा वापर बंधनकारक असेल. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिला ५०० रुपयांचा दंड राहील.
- प्रत्येक वेळी वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. चालक तसेच इतर कर्मचारी यांना लसीकरण बंधनकारक राहील. अन्यथा आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र (१५ दिवसांसाठी वैध असलेले) जवळ बाळगावे लागेल. तपासणीमध्ये चालक किंवा कर्मचारी याच्याकडे असे प्रमाणपत्र अथवा लसीकरण न घेता काम करत असलेला आढळल्यास १००० रुपये दंडास पात्र राहील.
कार्यालये
- सहकारी, सार्वजनिक आणि खासगी बँका, विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, सेवा पुरवठादार, विमा आणि मेडिक्लेम कंपन्या, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये वगळता, सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.
- सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनुसार सुरू राहतील. तथापि, आवश्यक असलेल्या कार्यालयासाठी त्यांचा विभागप्रमुख यांच्या निर्णयानुसार १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
- विदयुत, पाणी, बँक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित शासकीय कार्यालये तसेच शासकीय महामंडळे, शासकीय कंपन्या या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. कार्यालयीन बैठका ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जातील. अभ्यागतांना प्रवेश बंद राहील. अभ्यागतांसाठी ऑनलाईन पध्दतीने भेटण्याची सुविधा सुरू करण्यात यावी.
- शासकीय कार्यालयांबाबत अपवादात्मक परिस्थितीत त्या शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख यांच्या परवानगीने ४८ तासांच्या आतील कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्यास, अभ्यागतांसाठी पास देऊन प्रवेश देता येईल.
खासगी आणि सरकारी कार्यालयातील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.
- खासगी वाहतूक व्यवस्था
खासगी वाहने तसेच खासगी बस सेवा, सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेमध्ये सुरू राहतील. निकडीच्या वेळी शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ या कालावधीत आवश्यक असल्यासच सुरु राहतील. सार्वजनिक वाहतुकीप्रमाणे चालक आणि प्रवासी यांच्यासाठी कोरोनाविषयक उपाययोजना तसेच लसीकरणाचे पालन करावे लागेल. हा नियम १० एप्रिलपासून अंमलात येईल.