मंडणगडमधील वडाप व्यावसायिकाचे तिन्ही खुनी गजाआड, तिघेही दापोलीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:47 PM2017-11-04T16:47:44+5:302017-11-04T16:56:09+5:30
प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असतानाही तांत्रिक तपासाचे आधारे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत दापोलीतील तिघांना अटक केली आहे. पैशाची चणचण असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली या तीनही आरोपींनी दिली आहे.
मंडणगड ,दि. ०४ : प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असतानाही तांत्रिक तपासाचे आधारे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत दापोलीतील तिघांना अटक केली आहे. पैशाची चणचण असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली या तीनही आरोपींनी दिली आहे.
३१ आॅक्टोबर रोजी उन्हवरे -तोंडली मार्गावर राजाराम चव्हाण यांचा खून झाला होता. याप्रकरणी अभिजीत सुधाकर जाधव (२२, रा. गवे), नरेंद्र संतोष साळवी (२०, रा. बोंडीवली खोतवाडी), अक्षय विष्णू शिगवण (२०, रा. बोंडीवली थोरलाकोंड) या तीनही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
राजाराम चव्हाण यांच्याशी कोणतीही ओळख नसताना केवळ त्यांच्यावर पाळत ठेवत ३१ रोजी गाडी भाड्याने हवी असल्याचे खोटे कारण सांगून वेरळ येथून चव्हाण यांना उन्हवरे मार्गावर नेले. यावेळी चव्हाण यांच्याकडील ऐवजाची चोरी करताना झालेल्या झटापटीत चव्हाण हे जखमी झाले व प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पळ काढला. त्यांना जिवंत सोडल्यास ते पोलिसांना सर्व सांगून आपल्याला अडचणीत आणतील या भीतीने तिघांनीही त्यांचा पाठलाग करुन त्यांना ठार मारले. त्यानंतर मृतदेह उन्हवरे - तोंडली मार्गावरील पुलाच्या मोरीखाली टाकला.
राजाराम चव्हाण यांचे दोन्ही मोबाईल लांबवल्याने केवळ कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून खुन्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, मंडणगडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक संभाजी यादव, दापोलीचे पोलीस निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी खुनाचा छडा लावला.
पैशांसाठी चोरीचा कट
खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांच्या हाती लागलेले नाही. हे तीनही तरुण पंचवीशीच्या आतील असून, अभिजीत वेल्डींगचे काम करतो तर नरेंद्र हा दापोलीतील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अक्षय कोणतेही शिक्षण घेत नसून, सध्या बेरोजगार आहे. पैशांसाठी चोरीचा कट रचल्याचे पुढे येत आहे.