अंगणवाडीसेविकांची सर्व कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:30+5:302021-09-04T04:38:30+5:30
रत्नागिरी : अंगणवाडी सेविकांना दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करण्यात आले आहेत. त्यामुळे ...
रत्नागिरी : अंगणवाडी सेविकांना दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणारी अंगणवाड्यांसह इतर कामेही ठप्प झाली आहेत. ही कामे आहार ट्रॅकर ॲपवर करण्यात येत होती.
पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. त्यातील अनेक मोबाईल बंद पडले होते. मोबाईलची वॉरंटी २ वर्षांची होती. ती मे, २०२१मध्ये संपलेली आहे. मोबाईल २ जीबी रॅमचा आहे. या मोबाईलवर अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार ट्रॅकर ॲप देण्यात आला होता. त्या ॲपमध्ये लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यात येते.
मोबाईल कमी क्षमतेचा असल्याने तो सारखा हँग होण्याचे प्रकार सुरू होते. तसेच तो लवकर गरमही होत असल्याने अंगणवाडी सेविकांना काम करणे कठीण झाले होते. त्याचबरोबर हे ॲप इंग्रजीमधून असल्याने अंगणवाडी सेविकांची मोठी अडचण झाली होती. अनेकदा अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यासाठी त्रयस्तांचे सहकार्य घ्यावे लागत होते. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज मिळत नसल्याने त्यांना माहिती भरण्यासाठी शेजारच्या गावात यावे लागत होते. अनेक मोबाईल नादुरुस्तही झाले होते. अशा विविध समस्या, अडचणींमुळे अंगणवाडी सेविका हैराण झाल्या होत्या. त्यामुळे अखेर त्यांनी मोबाईल फोन शासनाला परत केले. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडून शासनाला ॲपद्वारे देण्यात येणारी कोणतीही माहिती शासनाला जात नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविकांकडून करण्यात येणारी सर्वच कामे ठप्प झाली आहेत.