आरोप-प्रत्यारोपांचे फटाके?

By admin | Published: November 18, 2016 11:12 PM2016-11-18T23:12:25+5:302016-11-18T23:12:25+5:30

नगर परिषद निवडणूक : फडणवीस, दानवे, तटकरेंसह बड्या नेत्यांच्या प्रचार सभांकडे जिल्ह्याचे लक्ष

Allegations of counter-allegations? | आरोप-प्रत्यारोपांचे फटाके?

आरोप-प्रत्यारोपांचे फटाके?

Next

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे अंतिम टप्प्यातील प्रचाराची माळ गुंफण्यासाठी लवकरच जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या प्रचारसभांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषदा व दापोली नगर पंचायतीची निवडणूक होत असली तरी यातील रत्नागिरी व चिपळूण या ब वर्गातील दोन नगर परिषदा ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार डावपेच खेळले जात आहेत. यातील रत्नागिरी नगर परिषद ही गेल्या कार्यकाळात सेना-भाजप युतीच्या ताब्यात होती. आता सेना व भाजप युती नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने रत्नागिरी, चिपळूणमध्येही भाजपची सत्ता आल्यास विकासाचे स्वप्न नागरिकांना दाखविले जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी फडणवीस सरकारने नगरोत्थान योजनेतून ६२ कोटींची सुधारित नळपाणी योजना मंजूर केली आहे. भाजपसाठी हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस २० नोव्हेंबरला रत्नागिरीत, तर २१ रोजी दानवे हे चिपळुणात सभा घेणार आहेत.
रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रात गेल्या पाच वर्षात युतीने काय विकास केला, असा सवाल करीत राष्ट्रवादीचे नेते सेना, भाजपवर बरसण्याची शक्यता आहे. चिपळूण नगर परिषदेवर गेली पाच वर्षे शहर विकास आघाडीची सत्ता होती. चिपळुणात माजी आमदार रमेश कदम यांचा असलेला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते चिपळुणात प्रचार सभा घेणार आहेत. रत्नागिरी हे जिल्हा राजधानीचे ठिकाण, तर चिपळूण हे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींचे मुख्य ठिकाण असल्याने या दोन्ही ब वर्ग नगर परिषदा ताब्यात असणे राजकीय पक्षांना महत्त्वाचे वाटते आहे.
खेड नगर परिषदेत गेल्या पाच वर्षात मनसेची एकहाती सत्ता होती. सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा हा राजकीय गड मानला जातो. मात्र, गेल्यावेळी हातून निसटलेला हा गड यावेळी मनसेकडून काबीज करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार आहे. आरोप - प्रत्यारोपांचे फटाके फुटणार आहेत.
चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव उतरणार प्रचार रिंगणात.
विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार.
नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० नोव्हेंबरला रत्नागिरीत येत आहेत. त्यांची जाहीर प्रचार सभा शहरातील प्रमोद महाजन संकुल येथे होणार आहे. त्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणावर भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रचार सभेला शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच संपूर्ण जिल्हाभरातील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Allegations of counter-allegations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.