राणे आले मनोमिलनही झाले, पण केसरकरांशिवाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:01 PM2022-11-04T17:01:35+5:302022-11-04T17:02:47+5:30
कारण बऱ्याच वर्षानंतर राणे व केसरकर हे युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून, यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ही येणार होते.
सावंतवाडी : खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष एकत्रित आले खरे, पण सगळ्यांच्या नजरा होत्या त्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमदार नितेश राणे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येतील अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण राणे आले मात्र मंत्री केसरकर हे मुंबई येथे भाऊ रुग्णालयात दाखल असल्याचे कारण देत आले नाहीत. पण त्यांचा किल्ला त्यांच्या समर्थकांनी लढवत मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले.
सावंतवाडी खरेदी-विक्री संघाची निवडणूक सध्या भाजप व बाळासाहेबांची शिवसेनाविरुद्ध महाविकास आघाडी यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील पहिली सहकार क्षेत्रातील युती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत झाली आहे. या युतीच्या निमित्ताने मंत्री केसरकर व आमदार राणे हे एकत्र येत प्रचाराचा शुभारंभ करतील अशीच सगळ्यांना आशा होती. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याने कार्यकर्त्यांतमध्येही उत्साह होता.
कारण बऱ्याच वर्षानंतर राणे व केसरकर हे युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून, यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ही येणार होते. आमदार राणे हे ठरल्याप्रमाणे आले खरे, पण मंत्री केसरकर हे आले नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्यांचा किल्ला लढवला तो त्यांच्या समर्थकांनी माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबोंसह अशोक दळवी, बबन राणे यांनी त्यामुळे दोन्ही पक्षांतील मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले. पण केसरकर आले नसल्याने त्यांची मात्र उणीव भासल्याचे दिसून येत होते.
पुढील बैठकीसाठी उपस्थिती लावणार असल्याची माहिती
मंत्री केसरकर हे मुंबई येथे रोजगार मेळावा असल्याने तेथे उपस्थिती लावणार होते. पण त्यांचे भाऊ आजारी असल्याने ते सध्या रुग्णालयातच येऊन जाऊन असतात. त्यामुळे सावंतवाडीतील कार्यक्रम टाळल्याचे सांगितले जात आहे. पण पुढील काही बैठकीसाठी ते निश्चित उपस्थिती लावतील, असेही त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.