पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर; रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’, जगबुडीने धोका पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत
By शोभना कांबळे | Published: July 25, 2024 06:24 PM2024-07-25T18:24:35+5:302024-07-25T18:27:27+5:30
जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ
रत्नागिरी : पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून पावसाबरोबरच वाऱ्याचाही मारा जोरदार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. बुधवारी पावसाचा जोर कमी असला तरीही खेडमधील जगबुडी नदीच्या पात्राने अजूनही धोका पातळी ओलांडलेली असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाने वाऱ्यासह गुरुवारी दुपारपासून जोर वाढविला आहे. हवामान खात्याने शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीची कामे वेळेत झाली असली तरी आता काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी भरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर तसा वाढलेला आहे. बुधवारी दिवसभर हलक्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. रात्रीही पाऊस थांबला होता.
मात्र, गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. जोडीला जोरदार वारे असल्याने सरींचा जोर असला तरी हलक्या प्रमाणात येत होत्या. दिवसभर पावसाळी वातावरण कायम होते. पाऊस आणि जोडीला वारा यामुळे जिल्ह्यात अनेक भागांत घरे, गोठे, दुकाने, शाळा यांची अपरिमित हानी होत आहे. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत. यंदा पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. दोन महिन्यांच्या आतच ६८ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.