कशेडी घाटाला पर्यायी विन्हेरे मार्गही खडतरच
By Admin | Published: June 30, 2017 04:06 PM2017-06-30T16:06:25+5:302017-06-30T16:06:25+5:30
मार्गाची सध्या दुर्दशा : वाहतुकीलाच धोकादायक
आॅनलाईन लोकमत
खेड (जि. रत्नागिरी) , दि. ३0 : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या तुळशी-विन्हेरे मार्गाची सध्या दुर्दशा झाली आहे़ महामार्गावर आवश्यक हलक्या व अवजड वाहनांच्या रहदारीसाठी आवश्यक सुविधादेखील या मार्गावर उपलब्ध नसल्याने हा पर्यायी मार्ग असून नसल्यासारखाच आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तुळशी-विन्हेरे रस्त्याची करोडो रूपये खर्चून मजबुती करण्यात आली होती. मात्र, हे काम निकृष्ट झाले असून, त्यामुळे या मार्गाची पुरती वाट लागली आहे. तसेच अद्यापही या मार्गावरील ४ किलोमीटर रस्ता नादुरूस्त असल्याने हा मार्ग वाहतुकीलाच धोकादायक बनला आहे. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून वापरात आलेल्या या मार्गासाठी राज्य सरकारने निधी दिला होता. मात्र, या निधीच्या खर्चाबाबतच संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. हा रस्ता पुरता उखडल्याने पावसाळ्यात हा मार्गच बंद होणार असल्याच्या शक्यतेने वाहनचालक धास्तावले आहेत़ या मार्गाची नव्याने पाहणी करून मार्गाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़
कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तुळशी-विन्हेरे हा मार्ग सर्वपरिचीत आहे. मात्र, सध्या या मार्गाची पुरती चाळण झाली असून, हा मार्गच आता ‘डेंजर झोन’मध्ये आला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थामुळे सध्या या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झालेली पाहायला मिळत आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कशेडी हा घाट रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे़ दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे हा घाट स्वागतच करीत असतो. मात्र, हाच कशेडी घाट गेल्या काही वर्षात शापीत झाला आहे. दरडी कोसळणे, लहान-मोठ्या अपघातांत अनेकांचे बळी जाणे आणि वाहनांचे नुकसान होणे अशा गंभीर घटना घडल्या आहेत. घाटातील एकूणच नागमोडी वळणे आणि चढ-उतारांमध्ये समतोल नसल्यामुळेदेखील या अपघातांना आमंत्रण मिळत आहे.