भरणे नाक्यावरील पर्यायी मार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:17+5:302021-06-16T04:42:17+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूला ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूला पर्यायी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे या मार्गाची पुरती दैना उडाली असून, वाहनचालकांना वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी भरणे, लवेल, लोटे येथील चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. भुयारी मार्गाचे काम वेगात सुरू असले तरी या कामामुळे वाहनचालकांच्या पदरी निराशाच पडली आहे. आधीच अरुंद सर्व्हिस रोडमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठेकेदार कंपनीने ठोस उपाययोजना न केल्याने सध्या सर्व्हिस रोड धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसामुळे हा रस्ता निसरडा झाला असून, चिखलामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. या मार्गावर खड्डे पडले असून, ते भरण्यासाठी केवळ मलमपट्टी केली जात आहे. रात्री या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत आहेत. भरणेसह वेरळ येथे व घाटातही हीच परिस्थिती आहे. मध्यभागी असलेल्या अर्धवट मार्गामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या प्रश्नी राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे.
रस्ता खचल्याने कंटेनर फसला
भरणे पर्यायी मार्गावर रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रस्ता खचल्याने कंटेनर मध्यभागी खचून वाहतूक ठप्प झाली हाेती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन कंटेनरला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिला.
-----------------------------
मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यात भरणे नाक्यावरील पर्यायी मार्गात खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धाेकादायक बनले आहे.