कृषी विभागाचा कारभार वर्ष उलटले तरी प्रभारीच्याच हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:57+5:302021-04-12T04:28:57+5:30
खेड : तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध खात्यांतर्गतच्या चार खात्यांचा कारभार वर्षानुवर्षे प्रभारीच्याच हातात आहे. त्यात तालुका कृषी कार्यालयातील कृषी ...
खेड : तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध खात्यांतर्गतच्या चार खात्यांचा कारभार वर्षानुवर्षे प्रभारीच्याच हातात आहे. त्यात तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांचीही भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रभारी कृषी विभागाचा कारभार हाकत आहेत. या खात्याला कायमस्वरूपी कृषी
अधिकारी मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, तालुका शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प या चार खात्यांचा कारभार सद्य:स्थितीत प्रभारीकडे आहे. तालुका
कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी पद रिक्त होते. याठिकाणी प्रभारीची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, तेही सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा कृषीचा कारभार प्रभारीच्या हाती सोपविण्यात आला आहे.
प्रभारी कृषी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी परिपूर्तता करताना यंत्रणेची कोंडी होत आहे. तालुक्यातील शेतकरी वर्षभरात तीन
वेगवेगळी पिके घेतात. यासाठी मंडल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीने मार्गदर्शन, खते-बियाणे पुरवण्याबरोबरच आदी मिळवून देण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. मात्र, मंडळ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अधिकाऱ्यांसह अन्य कृषी सहायक फिरकत नसल्याच्या तक्रारी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
तालुका अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी असल्यामुळे ठोस निर्णय घेता येत नसल्याची बाब पुढे आली आहे. याचमुळे तालुक्यातील शेतकरी अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी पद भरण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.