पावस परिसरात रुग्णसंख्या वाढतेय तरी गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:12+5:302021-05-09T04:32:12+5:30
पावस : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे आगमन झाल्यानंतर पावस परिसरात त्यांनी आपले बीज रोवल्यानंतर विषाणूच्या संसर्गला मोठ्या प्रमाणात गती मिळली ...
पावस : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे आगमन झाल्यानंतर पावस परिसरात त्यांनी आपले बीज रोवल्यानंतर विषाणूच्या संसर्गला मोठ्या प्रमाणात गती मिळली आहे़ पावस परिसरात रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे़ रुग्णसंख्या वाढत असतानाही बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही़ त्यामुळे काेराेनाच्या संसर्गाची भीती वाढली आहे़
मागील वर्षाचा तुलनेत पावस परिसरामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ १ जानेवारी ते १९ एप्रिलदरम्यान रुग्णसंख्या ६६ वर जाऊन पोहोचली होती़ ही संख्या वाढतच असून, सध्या पावस परिसरात १२३ रुग्ण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत़ त्यात ५० रुग्णांना गृह अलगीकरणात आहेत़ त्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे़
शासनाचे कडक निर्बंध असतानाही सकाळी ७ ते ११ दरम्यान कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न ठेवता खरेदीसाठी गर्दी केली जात आहे़ त्यामुळे संसर्गाचा धाेका वाढला आहे़ त्याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत रुग्ण शोधण्याकरिता आरोग्य पथके दाखल झाली आहेत़ प्रत्येक वाडी - वस्तीवर जाऊन तपासणी केली जात आहे़
पावस प्राथमिक आराेग्य केंद्रात ८ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत काेव्हॅक्सिन ६३५ व काेविशिल्ड ९९५ असे एकूण १६३० डोस ४५ वर्षावरील लोकांना देण्यात आले आहेत़ मात्र, त्यानंतर लस उपलब्ध नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत आहेत़ यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क केला असता ते म्हणाले की, वारंवार लसीची विचारणा न करता साठा उपलब्ध झाल्यावर देऊ, असे सांगण्यात आले़
जानेवारी ते मार्चदरम्यान विषाणूचा संसर्ग फारच कमी होता़ मात्र, शिमगोत्सवानंतर चाकरमान्यांनी बीजारोपण केल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे चित्र स्पष्ट आहे़ प्रत्येक नागरिकांनी घरात राहून आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे़ त्यासाठी काही अडचण असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, जेणे करून संसर्ग रोखण्यास मदत होईल.
- डॉ. सुबोध इगळे, नोडल अधिकारी