सत्तेचा सारीपाट: कोकणातील जुन्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू
By मनोज मुळ्ये | Published: April 19, 2024 01:49 PM2024-04-19T13:49:24+5:302024-04-19T13:50:08+5:30
मनोज मुळ्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी भाजपकडे राहणार, हे निश्चित झाले आणि त्यासाठी उमेदवार म्हणून खासदार ...
मनोज मुळ्ये
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी भाजपकडे राहणार, हे निश्चित झाले आणि त्यासाठी उमेदवार म्हणून खासदार नारायण राणे यांचे नाव घोषित झाले. गेला महिनाभर रोज नव्या चर्चा, रोज नवी नावे, रोज नवे तर्क असे संभ्रमाचे वातावरण होते. आता मंत्री उदय सामंत म्हणतात, त्याप्रमाणे तिढा, पेच, गुंता सुटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांचा महायुतीमध्ये सन्मान होईल, असा शब्द दिला आहे आणि हा गुंता सोडवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे नाव भाजपने उमेदवार म्हणून जाहीर केल्यास महायुती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे घोषित करून उदय सामंत यांनी या निवडणुकीतील चित्र स्पष्ट केले आहे. आता महायुतीकडून नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांच्यामध्ये प्रमुख लढत होईल, असे चित्र आता तरी दिसत आहे. अर्थात राणे यांच्यासमोर विनायक राऊत उमेदवार असले तरी हा राणे विरुद्ध ठाकरे हा साधारण १९ वर्षे सुरू असलेल्या संघर्षाचा नवा अध्याय ठरू शकेल.
१९९० पूर्वी नारायण राणे मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार ते १९९० साली कोकणात आले. पहिलीच विधानसभा निवडणूक ते जिंकले आणि तेव्हापासून सातत्याने २००४ पर्यंत सलग चार विधानसभा निवडणुका शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळेच्या पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यांनी २००५मध्ये शिवसेना सोडल्यापासून ठाकरे विरूद्ध राणे असा मोठा संघर्ष सुरू झाला. राजकीय आरोप - प्रत्यारोप हा भाग नित्याचा झालाच, पण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले शिवसेनेचे प्राबल्यही कमी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संपणार की काय, अशी चर्चा असतानाच २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणे यांचा पराभव केला. अर्थात तरीही ठाकरे विरूद्ध राणे हा संघर्ष या-ना त्या पद्धतीने सुरू होता. राणे यांच्यावर टीका करण्याला शिवसेनेत (आताच्या उद्धवसेनेत) खूप महत्त्व आहे.
आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा हा संघर्ष समोर येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी होण्यापेक्षा राणे विरूद्ध ठाकरे अशीच होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर टीका केल्यानंतर दिले जाणारे प्रत्युत्तर राजकीय खळबळ उडवून देणारे असते. आजवर असे प्रत्युत्तर राणे यांच्या परिवाराला एक पाऊल मागे नेणारे ठरले आहे. हे उद्धवसेनेला माहिती असल्याने मुद्दामहून त्यांना डिवचण्याचा प्रकारही केला जाण्याची शक्यता आहे.
विनायक राऊत २०१४ साली प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी मोठा विजय मिळवला. नीलेश राणे यांच्याविरोधात त्यांनी दोनदा विजय मिळवला आहे. आता त्यांच्यासमोर नारायण राणे उभे आहेत. राऊत यांचा स्वभाव आक्रमक पद्धतीचा नाही. जशी आक्रमक शैली भास्कर जाधव यांच्याकडे आहे, तशी आक्रमकता राऊत यांच्याकडे नाही. त्यामुळे राणे यांना थोपवण्यासाठी उद्धवसेनेकडून आक्रमक पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे.
उद्धवसेनेकडून भाजपपेक्षा राणे यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही लढाई राणे विरूद्ध राऊत अशी न होता, राणे विरूद्ध ठाकरे अशी होण्याची शक्यता अधिक आहे.