सुरक्षितता कायम आचरणात आणा
By Admin | Published: January 1, 2015 10:26 PM2015-01-01T22:26:30+5:302015-01-02T00:06:59+5:30
विनीत चौधरी : गुहागरात एस. टी. सुरक्षितता मोहीम सुरु
गुहागर : चालकांच्या हातात प्रवाशांच्या एस. टी.चे जीवन आहे. एस. टी. प्रशासन प्रवाशांचा विश्वास गमावत आहे, तो मिळवण्यासाठी अशा मोहिमा असतात. म्हणून ही सुरक्षितता मोहीम जीवनात कायमस्वरुपी आचरणात आणावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केले.गुहागर आगारातर्फे १ ते १० जानेवारी दरम्यान असलेल्या सुरक्षितता मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. चौधरी म्हणाले की, नशीब तुम्हाला नेहमीच साथ देणार नाही. क्षणिक वेळेची चूक आयुष्यभरासाठी नुकसानदायी ठरते. काटेकोरपणे नियम पाळले, तर अपघात टाळता येतील. गुहागर आगारातर्फे १ ते १० जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम कायम राबविल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल असे त्यांनी सांगितले. रस्ते सुरक्षा व वाहन सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. चौधरी यांनी या कार्यक्रमादरम्यान सर्वांनी वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन केले. तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील जनता सामान्य कुटुंबातील असल्याने कायम एस. टी.ने प्रवास सुरू असतो. एस. टी.ला आरामदायी प्रवास देता येत नसला तरी सुरक्षित सेवा देऊन देशसेवा करुया, असे आवाहन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद कुयबा म्हणाले की, एस. टी.ला चांगले रस्ते देणे आमची जबाबदारी आहे. दरवर्षी जगात अपघाताने १ कोटी २४ लाख, तर मुंबई मार्गावर १ हजार लोक मृत पावतात. अपघाताच्या बाबतीत आपल्या देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. रस्त्यांचा दर्जा सुधारत असून, वाहनांची संख्या वाढत आहे. यातून स्पार्धाही वाढत आहे. अशा स्थितीत एस. टी. टिकवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आले कर्तव्य बजावले पाहिजे, असे आवाहन आगार व्यवस्थापक योगेश कारंजकर यांनी केले. यावेळी कस्तुरी सुर्वे, कामगार प्रतिनिधी रवींद्र घाटे आदी उपस्थित होते. विवेक गानू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)