‘अंनिस’तर्फे आयोजित कोकण विभागीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत अमर पवार प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:08+5:302021-06-26T04:22:08+5:30
रत्नागिरी : बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य लोकांना कळावे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत ...
रत्नागिरी : बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य लोकांना कळावे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत कोकण विभागीय ‘बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विभागीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातून अमर पवार यांना प्रथम क्रमांक मिळाला.
ही स्पर्धा १८ ते २० जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती, यात ५९ जणांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुजाता सखाराम घोडीगावकर, प्रा. शंकर देवदास बळी, प्रा. आनंदराज रवींद्र घाडगे यांनी केले.
दुसरा क्रमांक विवेक मधुकर वारभुवन (नवी मुंबई), तिसरा क्रमांक आर्या किशोर कदम (सिंधुदुर्ग) यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, ट्राॅफी व पुस्तके देऊन परीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या तिन्ही स्पर्धकांना शुक्रवारी राज्यस्तरीय स्पर्धेला निमंत्रित करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ क्रमांकप्राप्त पराग राजेंद्र बदिरके (रायगड), अभिषेक शोभा सुरेश पाटील (रायगड), सिद्धी सुभाष वेंगुर्लेकर (मुंबई) यांनाही गौरविण्यात आले.
महा-अंनिसच्या विविध उपक्रम विभागातर्फे अतुल सवाखंडे , अनिल करवीर, नितीन राऊत व गजेंद्र सुरकार यांची संकल्पना व नियोजन होते. तांत्रिक बाजू मनोज डोमे, सचिन थिटे यांनी सांभाळल्या. अंनिसच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.