रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच
By अरुण आडिवरेकर | Published: November 11, 2022 07:13 PM2022-11-11T19:13:34+5:302022-11-11T19:13:55+5:30
हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे.
रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबर २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. रत्नागिरी केंद्रावर ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे ही स्पर्धा होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे.
हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. यावर्षी मालवण केंद्रातून १५ आणि रत्नागिरी केंद्रातून ११ संघ सहभागी झाले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच असणार आहे.
सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदू जुवेकर यांच्याशी संपर्क साधावा.
दिनांक - संस्था नाटक
३० नोव्हेंबर - युथ फोरम, देवगड, सिंधुदुर्ग - निर्वासित
१ डिसेंबर - श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ, जानशी, राजापूर - फेसबुक फ्रेंडस्
२ डिसेंबर - श्री भैरीदेव देवस्थान, जांभारी, रत्नागिरी - कळा या लागल्या जीवा
३ डिसेंबर - संकल्प कलामंच, रत्नागिरी - मावळतीचा इंद्रधनु
५ डिसेंबर - संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरुख - एक्स्ट्रीम
६ डिसेंबर - सहयोग, रत्नागिरी - मड वॉक
७ डिसेंबर - रत्नवेध कलामंच, रत्नागिरी - प्रतिध्वनी
८ डिसेंबर - कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी - तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?
९ डिसेंबर - कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, रत्नागिरी - मेलो डोळो मारुन गेलो
१० डिसेंबर - आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी - रात्र संपली पण उजाडलं कुठं
१२ डिसेंबर - अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ, रत्नागिरी - किनारा