विलोभनीय! गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा निळ्या लाटांनी चमकला
By अरुण आडिवरेकर | Published: October 29, 2022 06:52 PM2022-10-29T18:52:39+5:302022-10-29T18:53:34+5:30
गणपतीपुळेचा समुद्र रात्रीच्यावेळी खास आकर्षण ठरत आहे.
रत्नागिरी : गेली काही वर्षे ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरीचे किनारे निळ्या लाटांनी चमकू लागले आहेत. गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील समुद्रकिनारा गेले तीन दिवस निळ्या लाटांनी चमकत आहे. त्यामुळे गणपतीपुळेचा समुद्र रात्रीच्यावेळी खास आकर्षण ठरत आहे.
रत्नागिरीतील युवा छायाचित्रकार परेश राजीवले याने या लाटांचा नजराणा कॅमेराबद्ध केला आणि त्याची चर्चा सुरु झाली. रत्नागिरीतील समुद्रात ऑक्टोबर महिन्यात दिसणाऱ्या या निळ्याशार लाटा कुतूहलाचा विषय ठरत आहे. गुहागरसारख्या ठिकाणी या लाटा हिरव्या दिसल्या होत्या.
नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो. खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या ‘निऑन लाईट्स’ सारख्या हिरव्या, निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे. ‘सी स्पार्कल’ म्हणूनही तो ओळखला जातो. सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या ‘विंटर ब्लूम्स’मुळे.
निसर्गाची ही विलोभनीय निर्मिती आहे. त्याचा अनुभव रत्नागिरीच्या किनाऱ्यावर येत आहे. टप्याटप्याने या लाटा आता आरेवारे, काळबादेवी, मांडवी, भाट्ये, वायंगणी किनाऱ्यावरही दिसतील. निसर्गाची ही अद्भुत रचना पाहायला ‘मँगो सिटी रत्नागिरी’ला भेट द्यावी़ - सचिन देसाई, रत्नागिरी.