कोरोनामुळे खेड येथील आंबेडकर जयंती उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:50+5:302021-04-13T04:29:50+5:30
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा १३० वा जयंती ...
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा १३० वा जयंती उत्सव रद्द करण्यात आला असून, आंबेडकरी जनतेने घरातूनच जयंती साजरी करावी, असे आवाहन खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अध्यक्ष राजरत्न तांबे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शासनाने ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्याअनुषंगाने १४ एप्रिल २०२१ रोजी होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम, या आदेशाचे पालन करून आपल्या गावातील शाखेतच साजरा करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.
तसेच जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये. दरवर्षीप्रमाणे होणारा जयंती महोत्सव यावर्षी साजरा करण्यात येणार नाही. संचारबंदी असल्याने कॅण्डल मार्च (शांती यात्रा) कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता धम्म ध्वजारोहण राजरत्न तांबे यांच्याहस्ते पार पडणार आहे. सकाळी ११.३० वाजता पूजापाठ, दुपारी १२ वाजता धम्मचारी अमोघ सागर हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.