रत्नागिरीत आंबेडकरवादी संघटनांचा मोर्चा, मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:10 PM2018-03-30T17:10:01+5:302018-03-30T17:10:01+5:30
खेड येथील महापुरूषाच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
रत्नागिरी : खेड येथील महापुरूषाच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
खेड येथील या घटनेचा निषेध करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात बौद्धजन पंचायत समिती, रत्नागिरी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बोधिसत्व प्रतिष्ठान, भीम युवा पँथर आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्हा रूग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी आला. या मोर्चाला अखिल ओबीसी समाज संघटनेनेही पाठिंबा दर्शविला. या ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
खेड येथील ही घटना निंदनीय असून, यापुढे अशा घटना घडू नयेत, याकरिता सामाजिक बांधिलकीतून आपलीही जबाबदारी असल्याचे मत विविध संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केले. या नेत्यांनी संयमाचे आवाहन करतानाच पुन्हा असे प्रकार जिल्ह्यात असे प्रकार घडले तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रशासनाला दिला.
खेड येथील घटनेतील समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी समाजविघातक कृत्ये घडणार नाहीत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्याकडे निवेदन देताना आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष एल. व्ही. पवार, भारिप बहुजन महासंघाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रशांत कांबळे, बहुजन समाज पार्टीचे विधानसभा महासचिव किशोर पवार, भीम युवा पँथरचे अमोल जाधव, बोधीसत्व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सी. ए. जाधव, आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव उपस्थित होते.
पक्षाविषयी भाषण नको
या मोर्चाच्या वेळी सामान्य आंबेडकरी जनतेच्या मनात अनेक गट तट करणाऱ्या विविध नेत्यांबद्दल चीड व्यक्त झाली. त्यामुळे हे नेते भाषण करताना उपस्थितांमधून पक्षाविषयी भाषण नको, असा सूर ऐकायला येत होता. त्यामुळे मोर्चाला वेगळे स्वरूप लागल्याचे दिसून आले.
आंबेडकर जयंती एकत्रित साजरी करण्याचा निर्णय
खेड येथील घटनेचा निषेध करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील आंबेडकर अनुयायी आणि विविध संघटना यांनी येत्या १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती एकत्रित साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेतला.