आंबेत - म्हाप्रळ पूल वाहतुकीस खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:11+5:302021-06-28T04:22:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत - म्हाप्रळ पूल रविवार, २७ जून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत - म्हाप्रळ पूल रविवार, २७ जून रोजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे.
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आंबेत पूल सुरू हाेण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्री व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. यामध्ये लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे, आमदार म्हणून मी स्वतः लक्ष घातले. तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने पाठपुरावा ठेवला. सर्व तांत्रिक बाजूंची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल वाहतुकीसाठी योग्य झाल्याचे तपासून घेतल्यानंतर त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, अधीक्षक अभियंता आर. एम. गोसावी व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी माजी आमदार संजय कदम, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, अजय बिरवटकर, नितीन म्हामूणकर, वैभव कोकाटे, राकेश साळुंखे, मोबिन परकार, अनिल रटाटे, बशीर मसुरकर, दीपक घोसाळकर, राजा लेंडे, राजेंद्र आंबेकर, सतीश दिवेकर, अनंत शिगवण, सर्फराज चिपोळकर, सज्जाद मुकादम व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
नवीन पुलाला मंजुरी आणण्याचा प्रयत्न
दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा भाग असल्याने याठिकाणी भविष्यकाळाचा वेध घेता नवीन पूल होणे आवश्यक आहे. तशी मागणी सातत्याने होत आहे. त्याचाच भाग म्हणून संबंधित विभागाने त्याचा प्रस्ताव सादर केला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्याला मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
-----------------------------
राष्ट्रवादीचा पाठपुरावा
पूल बंद असल्याने मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिकांची फार मोठी गैरसोय होत असल्याचे पाहून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम हे सातत्याने पूल लवकरात लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू हाेता. आदिती तटकरे यांनी विशेष लक्ष घालून दुरुस्ती काम पूर्णत्वास नेल्याचे मुकादम यांनी सांगितले़
---------------------
दुरुस्तीनंतर आंबेत पुलाचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लाेकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय कदम, मुझ्झफर मुकादम उपस्थित हाेते.