फुणगूस आरोग्य केंद्राची दुरुस्ती सुरु

By admin | Published: March 18, 2015 10:15 PM2015-03-18T22:15:19+5:302015-03-18T23:57:35+5:30

हिरवा कंदील : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर यंत्रणा झाली जागी--लोकमतचा दणका

Ambulance of the Finger Health Center | फुणगूस आरोग्य केंद्राची दुरुस्ती सुरु

फुणगूस आरोग्य केंद्राची दुरुस्ती सुरु

Next

फुणगूस : दुर्दशेच्या फेऱ्यात अडकलेल्या फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थान इमारत दुरुस्ती करण्याच्या ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीला धुडकावणाऱ्या जिल्हा प्रशासनाला ‘लोकमत’च्या दणकेबाज वृत्तामुळ जाग आली असून, दुरुस्ती कामाला हिरवा कंदील मिळाला आहे एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवासस्थानात जीवन मरणाच्या कचाट्यात राहून जीवन व्यतित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लोकमतला धन्यवाद दिले आहेत.
गेले काही दिवस फुणगूस आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू होती. या आरोग्य केंद्राची इमारत अखेरची घटका मोजत आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचीही मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली आहे. त्यामुळे विशेष करून पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. याबाबत सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत तसेच कर्मचारी निवासस्थान इमारतीची पार दुर्दशा झाली आहे.
कर्मचारी निवासस्थान इमारतीचे स्लॅब तसेच प्लास्टर निखळून पडू लागले तर भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या भिंती पडतील की काय? अशी भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत होती.
इमारतीत दिवसागणिक इमाने इतबारे रुग्णांना सेवा देणाऱ्या येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटूंबासहित अक्षरश: जीव मुठीत घेऊन राहवे लागत आहे. पावसाळ्यात स्लॅबमधून येणाऱ्या पाण्यामुळे तर जगणे नकोसे होत होते. आरोग्य केंद्राच्या नादुरुस्त इमारतीत कर्मचाऱ्यांसह औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वावरावे लागत होते.
अनेकदा येथील ग्रामस्थांनी या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. असतानाही याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या. ‘लोकमत’ने नादुरुस्त इमारतीच्या छायाचित्रासह सडेतोड वृत्त सादर करताच खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली असून, सुमारे २८ लाख मंजूर झालेल्या इमारतींच्या दुरुस्ती कामाला सुरुवातही झाली आहे.
काही महिन्यांमध्येच सुसज्ज, सुव्यवस्थित इमारतीत कर्मचाऱ्यांना वास्तव्य करता येणार असल्याने कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Ambulance of the Finger Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.