रुग्णवाहिकेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:29+5:302021-05-13T04:32:29+5:30
राजापूर : तालुक्यातील तुळसवडे गावामध्ये प्रथमच आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेण्यासाठी भाजप प्रदेश सचिव, ...
राजापूर : तालुक्यातील तुळसवडे गावामध्ये प्रथमच आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेण्यासाठी भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी रायपाटण कोविड केअर सेंटरला दिलेली रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध झाल्याने या रुग्णाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे तुळसवडे सरपंच संजय कपाळे यांनी राणे यांसह भाजप पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
कोरोना संसर्ग काळात आजपर्यंत तुळसवडे गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी फळसमकरवाडीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तत्काळ त्यांना उपसरपंच संजय कपाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी
रायपाटण कोविड सेंटर रायपाटण येथे आणले; परंतु त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता
होती. ही बाब समजताच माजी खासदार नीलेश राणे यांच्या सूचनेवरून युवा कार्यकर्ते समीर खानविलकर यांनी रायपाटण कोविड सेंटरला दिलेल्या रुग्णवाहिकेतून त्या रुग्णाला रत्नागिरी येथे हलवण्यात आले.
या रुग्णाला वेळेवर रत्नागिरीत नेण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
याकामी संजय कपाळे, भाजप जिल्हा सरचिटणीस राजू भाटलेकर यांनी विशेष प्रयत्न केले. या ठिकाणी औषध-पाण्यासाठी लागणारी आर्थिक मदतही संजय
कपाळे यांनी केली. तत्काळ उपचार मिळाल्याने हा रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.