ताशा वादनातून जागवल्या अमितच्या स्मृती
By admin | Published: February 23, 2015 09:45 PM2015-02-23T21:45:53+5:302015-02-24T00:02:25+5:30
गुहागरात ढोल वादन : समुद्रकिनारा अथवा एका रस्त्याला अमितचे नाव देण्याची मागणी
गुहागर : गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानच्यावतीने आयोजित ‘जयघोष युवा शक्तीचा’ या ताशे व ढोल वादनाच्या कार्यक्रमातून गुहागर आजोळ असणारा पुणे येथील ताशासम्राट अमित फाटक याला हा कार्यक्रम समर्पित करुन अमितच्या स्मृती जागवण्यात आल्या.व्याडेश्वर मंदिर ते गुहागर पोलीस परेड मैदान अशी ताशे व ढोल पथकाने शिवनामाचा जयघोष करत शोभायात्रा काढली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताशासम्राट अमित फाटक याच्या माता-पित्यांचा व ढोल पथकाचे प्रमुख वैभव वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव वाघ याने ताशासम्राट अमित फाटक यांच्या स्मृती जागवताना सांगितले की, पुण्यात अमित फाटक हा ताशा वाजवायला लागला की, तो ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येत असत. पुण्यातील बहुतांश ताशा व ढोल वाजवणाऱ्या पथकातील मुलांना अमितने ठेका धरायला शिकवलं आहे. पुणे नगरपालिकेने या कार्याची दखल घेत पुण्यातील गजबजलेले ठिकाण असलेल्या शगून चौक ते रमणबाग चौक या रस्त्याला ताशासम्राट अमित फाटक यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
यावेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, सचिव सुहास आठवले, नगराध्यक्ष जयदेव मोरे, तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, अपरांत भूमीचे संतोष वरंडे, प्रकाश भावे, अनिकेत गोळे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगरे मंडळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)
गुहागर हे अमितचे आजोळ आहे. गुहागर नगरपंचायतीने याची दखल घेऊन समुद्र किनाऱ्यावरील व्ह्यू गॅलरी किंवा एखाद्या रस्त्याला अमितचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे.