अमोल पालये यांची ‘पहिली रात्र’ एकांकिका राज्यस्तरावर द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:10+5:302021-04-03T04:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नाटक या विषयाला वाहून कार्यरत असणाऱ्या संवाद सेवा संस्था, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नाटक या विषयाला वाहून कार्यरत असणाऱ्या संवाद सेवा संस्था, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत रत्नागिरीतील नवोदित लेखक अमोल अनंत पालये यांच्या ‘पहिली रात्र’ या एकांकिकेला द्वितीय क्रमाकांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन. ते झालंच नाही तर..? आणि एखाद्याच्या मनातल्या भीतीतून अंधश्रध्देचा कसा जन्म होतो, आणि त्या अंधश्रध्देचा समाज कसा फायदा उठवतो, याचे कोकणात घडणाऱ्या कथेवरील नाट्यमय लेखन ‘पहिली रात्र’ या एकांकिकेतून लेखक अमोल पालये यांनी केले आहे. समाज व्यवस्थेवर भाष्य करणारी ही एकांकिका कोकणातील संगमेश्वरी बोलीतून लिहिण्यात आली आहे.
यापूर्वीही लेखक अमोल पालये यांनी विविध कथा, अलक, एकांकिकांचे लेखन केले असून, त्यांना विविध पारितोषिके प्राप्त झाली आहेत. तसेच अनेक कथा नामांकित दिवाळी अंकातून प्रसिध्दही झाल्या आहेत. त्यांचे ‘पायरबुवांच्या झाकन्या’ हे संगमेश्वरी बोलीतील सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. याशिवाय त्यांनी ‘अक्रित झो... मरनाच्या भायरं बेफाट’ या लोकप्रिय संगमेश्वरी बोलीतील वेबसिरीजचे संवाद लेखनही केले आहे. नमन, खेळ्यातील दुर्मीळ म्हणी-बतावणी-आख्याने यांचे संकलन करण्याचे काम सध्या ते करत आहेत.
याशिवाय ते ग्रंथालय चळवळीत सक्रिय राहून विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवर, लेखक, नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी, पत्रकारिता श्रेत्र, ग्रंथालयप्रेमींमधून अभिनंदन होत आहे.