झाडाच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा

By admin | Published: March 27, 2016 10:09 PM2016-03-27T22:09:17+5:302016-03-28T00:21:00+5:30

आंबा द्वीदलीय झाड : फळांचा टिकाऊपणा वाढतो

The amount of pancelutrazole according to the extension of the tree | झाडाच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा

झाडाच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा

Next

आंबा हे द्वीदलीय वर्गातील झाड असल्यामुळे त्याला दोन प्रकारची मुळे असतात. सोटमूळ अन्नरस आणि पाणी शोषणारी तंतुमय किंवा तारमुळे. यापैकी सोटमूळ व अनेक प्राथमिक मुळे ही मुख्यत्वे झाडाला उंचीनुसार आधार देण्याचे काम करतात. ती खोलवर पसरतात़ परंतु, तंतुमय किंवा तारमुळे जी अगदी सूक्ष्म असतात, अशी ७० टक्के मुळे सर्वसाधारणपणे जमिनीच्या वरच्या थरात ८ ते १० इंच खोलीवर आणि झाडाच्या पसाऱ्याच्या ३५ ते ४० टक्के अंतराच्या आत पसरलेली असतात. याच मुळांद्वारे पॅक्लोब्युट्राझोलचे शोषण होत असल्याने जमिनीच्या ४ ते ५ इंच खोलीवर टिकावाच्या सहाय्यानेच (पहारीने नव्हे) मारलेल्या लहान खड्ड्यांमधून झाडाच्या बुंध्यांभोवती वर्तुळाकारात दिल्यास ते सहज झाडाला उपलब्ध होते. वर्तुळाकारात छिद्र घेऊन पॅक्लोब्युट्राझोल देणे शक्य नसेल किंवा झाड अडचणीच्या ठिकाणी (तीव्र उतार, शेताचे बांध, गडगा) अशा अडचणीच्या ठिकाणी असल्यास झाडाच्या बुंध्याभोवती १ फूट अंतरावर लहान चरीतून पॅक्लोब्युट्राझोलचे द्रावण द्यावे व चर मातीने बंद करावा.
झाडाच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा देण्याची शिफारस आहे, वयानुसार नव्हे. प्रमाणापेक्षा जास्त मात्रा दिली गेल्यास अशा झाडावर २ ते ३ प्रकारची लक्षणे दिसू शकतात. यापैकी पहिले लक्षण म्हणजे पॅक्लोब्युट्राझोल दिल्यानंतर येणारा मोहोर हा नेहमीप्रमाणे लांबट आकाराचा न येता खूपच आखूड पुष्पगुच्छासारखा येऊन फुले दाटीने उमललेली दिसतात. काहीवेळा नवीन पालवीमध्ये आलेल्या शेंड्यांची लांबी सरासरी ६ ते ८ इंच नसून, १ ते २ इंच एवढी तोकडी असते. त्यावर सर्व पाने दाटीने एकाच ठिकाणी आल्यासारखी दिसतात. हे लक्षणसुध्दा पॅक्लोब्युट्राझोल प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास आढळून येते. त्याचबरोबर काहीवेळा झाडाच्या मुख्य खोडातून आणि फाद्यांमधून फणसाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मोहोर बाहेर पडतो.
पहिल्या वर्षी जुलै - आॅगस्ट महिन्यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या झाडावर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात मोहोर येऊन मार्च - एप्रिलमध्ये पक्व झालेली फळे तोडली जातात. अशा झाडावर पुन्हा जुलै-आॅगस्टमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करावयाचा झाल्यास त्या झाडांना फळे तोडणीपूर्वी किंवा तोडणीनंतर किमान एकवेळा तरी नवीन पालवी फुटणे आवश्यक आहे. ही पालवी जुलै-आॅगस्टपर्यंत अर्धपक्व होते. अशा पालवीच्या झाडांना जुलै - आॅगस्टमध्ये पॅक्लोब्युट्राझोल दिल्यास पुढील वर्षीही पहिल्या वर्षीप्रमाणे मोहोर येऊन उत्पादन मिळते. हे चक्र यशस्वी होण्याकरिता पहिल्या वर्षीची आंबा फळाची तोडणी झाल्यानंतर शिफारसीप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा सेंद्रीय आणि रासायनिक खताच्या स्वरुपात, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच देणे अत्यंत गरजेचे ठरते. परंतु, पहिल्या हंगामातील भरपूर उत्पादन घेतल्यानंतर पुढील जुलै - आॅगस्टपूर्वी झाडावर नवीन पालवी आली नसल्यास त्या झाडांना केवळ पॅक्लोब्युट्राझोल घातल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही.
पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या कलमावरील मोहोराचे तुरे आखूड राहतात. त्यामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण नेहमीपेक्षा ५० ते ६० टक्क्यांनी अधिक असल्यामुळे फळधारणा अधिक होते, म्हणूनच उत्पादन वाढते. तसेच पॅक्लोब्युट्राझोल वापरलेल्या झाडावरील आंब्याचा दर्जा सुधारतो. विद्यापीठाने केलेल्या सुधारित शिफारशीप्रमाणे १.५ किलो नत्र, ०.५ किलो स्फुरद आणि १ किलो पालाश सल्फेट आॅफ पोटॅशच्या स्वरुपात + ५० किलो शेणखत दरवर्षी दिल्यास फळांचा आकार नेहमीसारखा राहून फळांची चव व गोडी सुधारते.
पॅक्लोब्युट्राझोलच्या वापरामुळे फळांचा टिकाऊपणा वाढतो़ तसेच फळ पिकण्याच्या क्रियेमध्ये वजनात होणाऱ्या घटीचे प्रमाणही कमी होते. हे आता सिद्ध झाले आहे.
ल्ल एम. एम. बुरोंडकर,
कोकण कृषी विद्यापीठ, दापोली



कोणत्याही आंब्याच्या झाडावरील पहिला मोहोर अति थंडीची लाट, रोग, किडी आदी कारणांमुळे वाया गेला किंवा काही कारणामुळे फळांची गळ झाली तर अशा झाडावर पुन्हा मोहोर येतो, हा जुना अनुभव आहे. हापूस आंब्यातील पुनर्मोहोर या समस्येवर ज्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावरुन या समस्येचा पॅक्लोब्युट्राझोल बरोबर काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही क्रिया हापूस जातीप्रमाणे इतर २८ आंबा जातींमध्ये तसेच पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या व न दिलेल्या झाडावर सारख्याच प्रमाणात आढळते.


हंगामाच्या सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये मोहार आल्यानंतर ४०-४५ दिवसांनंतर मोहोरावर वाटाण्याच्या अथवा बोराच्या आकाराची फळे असतात, अशावेळी थंडीची तीव्रता आणि कालावधीत वाढ झाली, तर पुनर्मोहोर फुटीचे प्रमाण वाढते. ही क्रिया पॅक्लोब्युट्राझोल न दिलेल्या झाडावरही आढळते़ त्यामुळे पॅक्लोब्युट्राझोल दिल्यामुळेच पुन्हा-पुन्हा मोहोर येतो, हा समज खरा नाही. या समस्येवर जिबरेलीक आम्ल फवारणीची शिफारस केली आहे.


पॅक्लोब्युट्राझोलचा वापर योग्यवेळी, योग्य त्या प्रमाणात, झाडांच्या आकारानुसार कमी अधिक प्रमाणात केल्यास कोकणासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सर्व ठिकाणी पॅक्लोब्युट्राझोल हे आंब्यासाठी उपयुक्त ठरले आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर वाढला आहे. त्यामुळे फळधारणाही चांगली होत आहे.


काही कारणांमुळे कलमांना पॅक्लोब्युट्राझोल देण्याचे बंद केल्यास त्याचे वाईट परिणाम न होता, त्या झाडांवर पॅक्लोब्युट्राझोल वापरापूर्वी वर्षाआड कमी अधिक प्रमाणात फळधारणा होत राहते. हे सहा वर्षांच्या चाचणीअंती सिध्द झाले आहे.

Web Title: The amount of pancelutrazole according to the extension of the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.