Sanjay Raut: मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By मनोज मुळ्ये | Published: February 17, 2023 02:18 PM2023-02-17T14:18:00+5:302023-02-17T14:24:31+5:30
न्यायालयासह कोणत्याही यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही
रत्नागिरी : जे तुमच्या मताचे नाहीत, त्यांची तुम्ही हत्या करणार का?, असा प्रश्न भाजपाला करुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्यालाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले. योग्य वेळ आल्यावर याबाबत विस्तृत बोलेन, असेही ते म्हणाले.
पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे शुक्रवारी रत्नागिरीत दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत खासदार राऊत यांनी सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप केला. न्यायालयासह कोणत्याही यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. प्रत्येक यंत्रणेवर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे वारिशे हत्या प्रकरणातही नीट तपास होईल की नाही, याबाबत आपल्याला शंका आहे, असे ते म्हणाले.
विरोध करणाऱ्या प्रत्येकाची हत्या करणार का?
विरोधी पक्षाच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. आता त्याही पुढे जाऊन त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. हा इशारा आहे का? आडवे येणाऱ्या, विरोध करणाऱ्या प्रत्येकाची हत्या करणार का, असा प्रश्न त्यांनी केला.
योग्य वेळ आल्यानंतर विस्तृत बोलेने
खोट्या गुन्ह्याखाली आपल्यालाही तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेथे आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यानंतर यावर विस्तृत बोलेने, असे सांगत त्यांनी देशात, राज्यात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचा आरोप केला.