रत्नागिरीत ई-व्हेइकलचा कारखाना उभारणार, उद्याेगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:31 PM2023-04-03T14:31:55+5:302023-04-03T14:32:21+5:30
रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर
रत्नागिरी : रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, दावाेस येथे रत्नागिरीसाठी एक सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार ईव्ही व्हेइकलचा अमेरिकन बेस कारखाना रत्नागिरीत हाेणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली, तसेच रायगड येथे स्किल इंडस्ट्रीज होत असून, रत्नागिरीतील उपकेंद्राला तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र (मिरजोळे ब्लॉक) अनिवासी इमारतअंतर्गत नवीन अतिथिगृहाचे बांधकाम करणे आणि जुन्या अतिथिगृह इमारतीचे नूतनीकरण करणे या कामाचे भूमिपूजन रविवारी (२ एप्रिल) मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत असून, अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीमध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी.एन. पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सुंदर, सर्व सोयींनी सुसज्ज असे एमआयडीसीचे विश्रामगृह होत आहे. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. एमआयडीसीमधील ८८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, त्यांना कायम केल्याचा आदेश येत्या दोन दिवसांत येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग जगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एमआयडीसीला जोडणारे शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतीतील रस्त्यांसाठी ३१ कोटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर काही एमआयडीसीसाठी आवश्यक रस्त्यांसाठीही १३ कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
उद्याेजकांना जे-जे लागेल ते-ते देऊ
रत्नागिरी इंडस्ट्रीज डी प्लसपेक्षा चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे-जे लागेल ते-ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो; परंतु उद्योजकांनीही रत्नागिरीमध्ये उद्योग करताना येथील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.