रत्नागिरीत वृद्ध महिलेला काेंडून दागिन्यांवर डल्ला, भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:23 PM2024-09-28T13:23:30+5:302024-09-28T13:23:44+5:30
रत्नागिरी : ‘खाेली भाड्याने मिळेल का?’ अशी चाैकशी करत वृद्ध महिलेला घरात काेंडून तिच्याकडील दागिन्यांची चाेरी केल्याची खळबळजनक घटना ...
रत्नागिरी : ‘खाेली भाड्याने मिळेल का?’ अशी चाैकशी करत वृद्ध महिलेला घरात काेंडून तिच्याकडील दागिन्यांची चाेरी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली. रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण टाॅकिज परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राधाकृष्ण टॉकिजसमोरील दत्त कॅफेच्या पाठीमागील बाजूला ही वृद्ध महिला एकटीच राहते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घर भाड्याने आहे का? म्हणून एक जोडपे चौकशीसाठी आले होते. काही वेळाने वृद्ध महिला बाजूला गेल्या हाेत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच हाेता. हीच संधी साधून हे जोडपे घरात शिरले. त्यानंतर वृद्ध महिला घरात येताच त्यांच्या पाठोपाठ एक पुरुष गेला आणि त्याने घरातील पुढील व मागील दोन्ही दरवाजे लावून घेत वृद्धेचे तोंड दाबून सगळे सोन्याचे दागिने काढून घेतले. मात्र, तिच्या हातातील एक बांगडी काढता न आल्याने मिळालेले दागिने घेऊन चाेरट्यांनी पाेबारा केला.
या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून पंचनामा केला. ज्या जागी चोरी झाली त्या भागात आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे लवकरच चाेरटे पाेलिसांच्या हाती लागतील, असे पाेलिस निरीक्षक ताेरसकर यांनी सांगितले.
वृद्ध महिला आजारी
अचानक घडलेल्या या घटनेने वृद्ध महिलेला धक्का बसला असून, ती आजारी पडली आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रेकी करून चाेरी
गेले दोन-चार दिवस दोन पुरुष या भागात फिरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी वृद्ध महिला घरात एकटीच राहत असल्याचे हेरून रेकी करून दागिन्यांची चाेरी केल्याचे सांगण्यात येत आहे.