कोकणचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By शोभना कांबळे | Published: August 8, 2023 07:05 PM2023-08-08T19:05:21+5:302023-08-08T19:41:12+5:30

रत्नागिरी : कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा ...

An important initiative to enhance the beauty of Konkan says Chief Minister Eknath Shinde | कोकणचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

रत्नागिरी : कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा फायदा होईल. देश-परदेशातून लोकं कोकणात येतात. मात्र, कोकणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आजचा उपक्रम महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी काढले.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधति बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलीकडेच सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्व स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे. पर्यटक, प्रवासी यांच्या सोयीसुविधांमध्ये या माध्यमातून वाढ होणार आहे. त्याचा निश्चितच चांगला परिणाम याठिकाणच्या पर्यटन संधी वाढण्यासाठी होईल. या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्परतेने सात महिन्यांत ही बारा रेल्वेस्थानके, रस्ते सुशोभिकरण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.या कामात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्व व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्व स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव दशपुते, कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, वैशाली गायकवाड, कोकण भवन यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

Web Title: An important initiative to enhance the beauty of Konkan says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.