कोसळलेल्या चिपळूण उड्डाणपुलाची चौकशी होणार : पालकमंत्री उदय सामंत
By संदीप बांद्रे | Published: October 18, 2023 11:45 AM2023-10-18T11:45:17+5:302023-10-18T11:45:59+5:30
नवीन पूल कोसळणं ही दुर्दैवी घटना
चिपळूण : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथील मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. नवीन पूल कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, पालकमंत्री ना उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे सोमवारी कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी आज पालकमंत्री सामंत यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण प्रांत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चिपळूण मधील ही घटना गांभीर्याने घेऊन चांगल्या दर्जाचे काम करणे गरजेचे आहे. यावेळी स्थानिकांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. घडलेल्या अपघातात मोठी हानी झाली नाही हे आपले भाग्य आहे. या विषयाची कसून चौकशी केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक लोकांशीही संवाद साधून माहिती जाणून घेतली.