सह्याद्रीच्या घनदाट जंगलात उद्या 'काजवे' पर्यटनाची संधी; ४० फूट घेर, १०० फूट उंचीचा अजस्त्र वृक्षही दाखवला जाणार
By मनोज मुळ्ये | Published: June 16, 2023 02:15 PM2023-06-16T14:15:26+5:302023-06-16T14:16:05+5:30
पर्यटना दरम्यान सह्याद्रीतील ४० फूट घेराचे आणि १०० फूट उंचीचा अजस्त्र वृक्ष दाखवला जाणार
रत्नागिरी : नवीन पिढीला निसर्गाची ओळख व्हावी, ऋतू बदलत असताना निसर्गाकडून कोणकोणते संकेत मिळतात याची अनुभूती व्हावी या उद्देशाने देवरुख येथील निसर्गप्रेमी युयुत्सू आर्ते यांनी १७ जून रोजी ‘काजवे पर्यटन’ आयोजित केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील निसर्गप्रेमींनी यामध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अमावास्येला काळाकुट्ट अंधार असतो. या अंधारात लाखो काजव्यांच्या सोनेरी प्रकाशाची उघडझाप पहायला मिळणे म्हणजे एक अद्भुत नजाराच. देवरुख येथील पार्वती पॅलेस हॉटेलजवळून १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता स्वतःचे वाहन घेऊन काजवे पर्यटनसाठी निघायचे आहे. देवरुखपासून केवळ ५० मिनिटांच्या अंतरावर सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पोहचायचे आहे.
सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी सोबत, बॅटरी, पायात बूट, हातात काठी, पुरेसे खाणे आणि पाणी घेऊन यायचे आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० हा काजवे पर्यटनाचा कालावधी असून, रात्री ११ वाजता देवरुख येथे परत यायचे आहे. या पर्यटना दरम्यान सह्याद्रीतील ४० फूट घेराचे आणि १०० फूट उंचीचा अजस्त्र वृक्ष दाखवला जाणार आहे. या काजवे पर्यटनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.